कोल्हापूर : सहायक फौजदार भोसले, शिंदे यांना राष्‍ट्रपती पोलिस पदक | पुढारी

कोल्हापूर : सहायक फौजदार भोसले, शिंदे यांना राष्‍ट्रपती पोलिस पदक

कोल्‍हापूर : पुढारी वृत्तसेवा

गुणवत्तापूर्ण सेवेसाठी कोल्‍हापूर पोलिस (Police) दलातील दोघांना राष्‍ट्रपती पोलिस पदक जाहीर करण्‍यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सहायक फौजदार अमरसिंह वसंतराव भोसले व महामार्ग पोलिसचे बबन नारायण शिंदे यांचा यामध्‍ये समावेश आहे.

अमरसिंह भोसले हे १९८८ साली पोलिस दलात भरती झाले. ते मूळचे कसबा बावडा, लाईन बझार येथील आहेत. त्‍यांनी शहर वाहतूक शाखा, आर्थिक गुन्‍हे शाखा, स्‍थानिक गुन्‍हे शाखा, राज्‍य गुन्‍हे अन्‍वेषण अशा महत्त्‍वपूर्ण विभागात कर्तव्‍य बजावले. सध्‍या ते लाचलुचपत प्रतिबंधक विभागात कार्यरत असून ३३ वर्षे सेवा काळात पोलिस महासंचालक पदकासह २४० बक्षीसे मिळाली आहेत.

वाहतूक नियंत्रण शाखेत असताना ते वाहतूक नियंत्रण प्रशिक्षणात राज्‍यात पहिल्‍या क्रमांकाने उतीर्ण झाले. बालिंगा (ता. करवीर) येथे पुलाच्‍या कठड्यावर एस. टी. बस नदीत कोसळल्‍याच्‍या घटनेवेळी त्‍यांनी आपत्‍कालीन यंत्रणेचा प्रभावी वापर करत अनेक जखमींचे प्राण वाचविण्‍याची मोलाची कामगिरी बजावली होती. लाईन बझार आणि पोलंडवासियांमधील दुसर्‍या महायुद्धानंतरच्‍या स्‍मृती जाग्‍या करणार्‍या ‘विस्‍मृतीत गेलेली अनोखी मैत्री’ हे त्‍यांचे पुस्‍तक सध्‍या प्रकाशनाच्‍या मार्गावर आहे. तसेच इन्‍फंट्रीच्‍या पाऊलखुणा या पुस्‍तकाचे लिखाणही ते करीत आहेत. संवेदनशील लेखक, साहित्‍य व कलाप्रेमी अशी त्‍यांचे वेगळी ओळख आहे.

बबन शिंदे यांचे मूळगाव सांगली जिल्‍ह्यातील मु. पो. वज्र चौंडे (ता. तासगाव) आहे. १९८७ साली ते राज्‍य राखीव पोलिस दल पुणे येथे पोलिस शिपाई पदावर भरती झाले. त्‍यांनी गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा या नक्षलग्रस्‍त भागात तसेच दिल्‍लीमध्‍येही कर्तव्‍य बजावले. त्‍यांची पोलिस दलात ३४ वर्षे पूर्ण होत असून चांगल्‍या कामगिरीबद्दल आतापर्यंत २७४ बक्षीसे मिळाली आहेत यामध्‍ये पोलिस महासंचालक पदकाचाही समावेश आहे. सध्‍या ते महामार्ग पोलिस विभागात कार्यरत आहेत.

हे ही वाचलं का

Back to top button