घसा का सुकतो? जाणून घ्या कारण | पुढारी

घसा का सुकतो? जाणून घ्या कारण

चिंता, तणाव, अस्थमा, धूम्रपान, अ‍ॅसिडीटी, अनियमित जीवनशैली, शरीरात पाण्याची कमतरता, पोषणाची कमतरता, अँटी डिप्रेशन औषधे आणि उच्च रक्तदाब यांसारख्या आजारांमध्ये किंवा कारणांमुळेही तसेच काही विशिष्ट औषधांमुळेही तोंड आणि घसा कोरडा पडण्याची परिस्थिती ओढवू शकते. सातत्याने दीर्घकाल अशीच परिस्थिती राहिल्यास तोंडाला सूज येते. त्यामुळे जेवण चावणे आणि गिळणे या दोन्ही प्रक्रियेत त्रास होतो. त्यामुळेच पाणी प्यायल्यानंतरही जर घशाला कोरड पडत असेल तर वैद्यकीय सल्ला घ्यावा लागतो.

घसा का सुकतो – घशाला कोरड पडणे, ही सर्वसाधारण समस्या आहे. उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यात घशाला कोरड पडण्याचा अनुभव अधिक प्रमाणात येतो. एकतर हिवाळ्यात घाम कमी येतो त्यामुळे तहानही कमी लागते. त्याचवेळी बाहेरील हवाही कोरडी असते. श्वसनातून गेलेल्या कोरड्या हवेमुळे घसाही कोरडा पडतो. उन्हाळ्यात तपमान अधिक असते आणि जास्त घाम आल्यामुळे घसा कोरडा पडतो. सतत पाणी प्यावेसे वाटते. शरीरात पाठीचा कणा आणि कूर्चा या दोन्हींमध्ये सुमारे 80 टक्के पाणी असते. शरीराला जर पाण्याची कमतरता भासल्यास त्याचा परिणाम आपल्या हालचालींवर होतो. विशेषतः सांध्यांच्या समस्या वाढतात. या व्यतिरिक्त दोन आठवड्यांपेक्षा अधिक दिवस घसा कोरडा पडत असेल तर एखाद्या विकाराचे ते प्राथमिक लक्षण असू शकते.

टॉन्सिलायटिस – घशामध्ये मागच्या बाजूला ओरटॉन्सिल्स नावाच्या दोन ग्रंथी असतात. त्यामुळे अनेक प्रकारच्या संसर्गांपासून आपला बचाव होतो. याच ग्रंथींना संसर्ग झाल्यास त्याला टॉन्सिलायटिस म्हणतात. त्यामध्ये ग्रंथींवर पांढर्‍या रंगाचा एक थर जमा होतो. हा थर एक प्रकारच्या बुरशीजन्य संसर्गाचा प्रकार असतो. यामध्ये घसा सुकण्याबरोबरच अन्न गिळण्यास त्रास होतो, शिवाय घसादुखी आणि कफ पडतो. कानात वेदना होतात, तसेच ताप येणे आदी लक्षणे दिसतात. या स्थितीत बदल करण्यासाठी औषधे घेण्याबरोबरच थंड पदार्थ सेवन व्यर्ज्य करावेत आणि कोमट पाण्याने गुळण्या कराव्यात.

अ‍ॅसिड रिफ्लक्स – यामध्ये अन्ननलिकेत आम्लाचे प्रमाण वाढते. पचनासाठी जठरामध्ये जे आम्ल तयार होते, ते खाली न जाता वर अन्ननलिकेत येते. त्यामुळे छातीत जळजळ होते आणि घशाला कोरड पडते. सतत पाणी प्यावे वाटत. परंतु, पाणी पिऊनही घशाची कोरड कमी होत नाही. रात्री उशिरा जेवल्यास किंवा खूप तिखट पदार्थ खाल्ल्यास ही समस्या निर्माण होते. ज्यांचं वजन अधिक आहे, त्यांनाही हा त्रास होतो. आहाराच्या सवयींमध्ये बदल आणि औषधांच्या मदतीने या समस्येवर उपाय करता येईल. परंतु, काही वेळा मात्र परिस्थिती गंभीर झाल्यावर डॉक्टर शस्त्रक्रियेचा सल्ला देऊ करतात.

अ‍ॅसिड रिफ्लक्स समस्येकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर विकार जडू शकतो. अ‍ॅसिड रिफ्लक्स वाढणे म्हणजे पचनासंबंधीचा रोग – गॅस्ट्रोएसोफेगल रिफ्लक्स डिसीज (जीईआरडी) ची सुरुवातही असू शकते.

अ‍ॅनेमिया – शरीराला रक्ताची कमतरता भासते तेव्हा त्याला अ‍ॅनेमिया म्हणतात. शरीरात लाल रक्तपेशी कमी होतात, त्यांंची पूर्तता करण्यासाठी शरीराला अधिक प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते तेव्हा घशाला कोरड पडते. चक्कर येणे, थकवा, दम लागणे आणि हृदयाची धडधड वाढणे आदी लक्षणे दिसून येतात. शरीरातील रक्ताची कमतरता पूर्ण करण्यासाठी औषधांबरोबर डॉक्टर समतोल आहाराचे सेवन करण्याचा सल्ला देतात.

मधुमेह टाईप 2- मधुमेह ही सध्या देशातील प्रमुख समस्या झाली आहे. कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना मधुमेह ग्रासू शकतो. मधुमेहाने पीडित व्यक्तींमध्ये मूत्रपिंडाची क्षमता बाधित झाल्याने सतत लघवी होते आणि शरीरातील पाणी बाहेर टाकले जात असल्याने घसा कोरडा पडतो. अर्थात, मधुमेहामध्ये यावर ठोस उपाय नाही. मात्र, योग्य औषधोपचार, वैद्यकीय सल्ला यामुळे व्यक्ती सर्वसाधारण जीवन जगू शकते.

श्वसनाचे आजार – दमा, अस्थमा यांसारख्या आजारांमध्ये घशाला सातत्याने कोरड पडते. त्यासाठी काही कारणे आहेत; जसे औषधांचे सेवन करणे, तसेच श्वसनाच्या आजारात व्यक्तींना नाकाने श्वास घेण्यास श्रम पडतात तेव्हा ते तोंडाने श्वास घेतात. परिणामी तोंडाला कोरड पडते. त्याव्यतिरिक्त इतर काही आजार आणि संसर्गामध्येही घशाला कोरड पडते. उदा.अल्झायमर, सिस्टिक फायब्रोसिस, रुमेटाईड संधिवात यामध्ये औषधांचा दुष्परिणाम म्हणून घशाला कोरड पडू शकते.

लघू रक्तदाब – अतितणाव आणि जीव घाबरा झाल्याने व्यक्तीचा रक्तदाब कमी होतो. तेव्हा घशाला कोरड पडण्याच्या स्थितीचा अनुभव येतो. रक्तदाब कमी झाल्यास शरीराला ऑक्सिजन आणि इतर पोषक घटक मिळण्यात अडचणी येतात. त्यामुळे सतत घसा सुकतो आणि तहान लागते. शिवाय चक्कर येणे, बेशुद्ध पडणे आणि हातपाय थंड पडणे आदी लक्षणे दिसून येतात. लघू रक्तदाबाची समस्या असेल तर डॉक्टर भरपूर पाणी पिण्याबरोबर आहारातील मिठाचे प्रमाण वाढविण्याचा सल्ला देतात.

हायपोथायरॉईड – हा आजार बहुतांश वेळा स्त्रियांना होतो. यामध्ये थायरॉईड ग्रंथी पूर्णक्षमतेने काम करू शकत नाहीत.
त्यामुळे वजन वाढणे, कोरडी त्वचा, अतिथंडी वाजणे, नैराश्य आणि घशाला कोरड पडणे ही लक्षणे दिसतात. रक्ताच्या तपासणीतून याचे निदान होते, त्यानंतर औषधे आणि संतुलित जीवनशैली यामुळे ही समस्या नियंत्रणात राहते.

Back to top button