इचलकरंजी : एसटी कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू | पुढारी

इचलकरंजी : एसटी कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

इचलकरंज : पुढारी वृत्तसेवा

राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलिनीकरण करावे यासह विविध मागण्यांसाठी बेमुदत लाक्षणिक उपोषण सुरु असताना इचलकरंजी आगारातील वाहक शरणाप्पा गिरमल्लाप्पा मुंजाळे (वय-31 मूळ रा. अक्कलकोट) यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला.

या घटनेने संतप्त कर्मचारी आणि नातेवाईकांनी जोपर्यंत आगार व्यवस्थापकांसह दोषींवर मृत्यूस कारणीभूत असल्याचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. यावेळी शिवाजीनगर पोलीस ठाण्यासह इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

एस.टी. कर्मचार्‍यांच्या मागण्यांबाबत सोमवारी मुंबई येथे खासदार शरद पवार, परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत कर्मचारी संघटना प्रतिनिधींनी बैठक बोलविण्यात आली होती. त्यामध्ये तोडगा निघेल अशी सर्वांचीच अपेक्षा होती. परंतु या बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही.

या संदर्भातील वृत्त उपोषणस्थळी मोबाईलवर पाहत होते. निर्णय न झाल्याचे वृत्त समजताच मंजुळे यांना अस्वस्थ वाटू लागले आणि त्यातच त्याचा हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने ते जाग्यावरच कोसळले. उपचारासाठी नेण्यात आले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. रात्री उशीरा या प्रकरणी आकस्मिक मयत म्हणून नोंद करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितल्यानंतर नातेवाईक शांत झाले.

Back to top button