वैभववाडीतील भाऊ-बहीण युक्रेनमधून परतले घरी

भाऊ-बहीण युक्रेनमधून परतले घरी.
भाऊ-बहीण युक्रेनमधून परतले घरी.

वैभववाडी : पुढारी वृत्तसेवा
वैभववाडी तालुुक्यातील आसावरी पांडुरंग काळे व दीपराज पांडुरंग काळे हे बहीण-भाऊ शिक्षणासाठी युक्रेनमध्ये होते. मात्र, युक्रेन व रशिया यांच्यात युद्ध सुरू झाल्याने हे भाऊ-बहीण युक्रेन मध्ये अडकलेे होते. शुक्रवारी रात्री हे दोघेही कोकिसरे येथे आपल्या घरी सुखरूप पोहोचले. आपली मुले सुखरूप घरी पोहोचल्याचे पाहून काळे कुटुंबीयांना आनंदाश्रू अनावर झाले. दरम्यान, आप्‍तेष्ट, नातलगांबरोबरच तालुक्यातील विविध पक्षाच्या राजकीय पदाधिकार्‍यांनी त्यांच्या कोकिसरे येथील घरी जात या भावंडांची विचारपूस केली.

वैभववाडी-कोकीसरे येथील शिक्षक पांडुरंग जानू काळे यांची कन्या आसावरी व मुलगा दीपराज ही दोन भावंडे युक्रेनमध्ये वैदयकीय शिक्षण घेत होते. बुकोव्हीनियन स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी चेन्‍नसी या ठिकाणी दोघांनीही एमबीबीएस साठी प्रवेश घेतला होता. दोघेही पहिल्या वर्षात शिकत होते. रशिया व युक्रेन या दोन देशात युद्ध सुरू झाल्याने भारतातील हजारो विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. युक्रेनमधून बाहेर पडण्यासाठी प्रत्येक नागरिकाला रोमानिया या देशात यावे लागत होते. भारतीय दुतावासाचे अधिकारी तेथील भारतीय विद्यार्थ्यांना यासाठी मदत करण्याचा प्रयत्न करत होते. पहिल्या टप्प्यात आसावरी ही रोमानिया देशात दाखल झालील व नंतर विमानाने दिल्ली येथे पोहचली. त्याचवेळी युद्ध आणखी भडकल्याने परिस्थिती बिकट बनली. परिणामी तिचा भाऊ दीपराज याला युक्रेन आहेर पडणे कठीण बनले. त्या परिस्थितीतही दीपराज याने जीवावर उधार होत तब्बल दोन दिवस पायी चालत रोमानिया गाठले. त्यानंतर दोन दिवसानी तो विमानाने मुंबईत पोहोचला. ही दोन्ही चुलते रामचंद्र काळे यांच्या चेंबूर येथील घरी बुधवारी पोहचली. मुंबईहून रेल्वेने दोघेही शुक्रवारी वैभववाडीत आपल्या घरी पोहोचले. विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी राज्य व केंद्र शासनाने खूप मदत केली. त्यांनी विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवास उपलब्ध करून दिला, त्याबद्दल शासनाचे पांडुरंग काळे यांनी आभार मानले.

या युद्धसंकटामुळे या भांवडांना शिक्षण सोडून मायदेशी परतावे लागले आहे.लहानपणापासून अभ्यासात हुशार असणार्‍या बहीण- भावाने डॉक्टर व्हायचे स्वप्न पाहीले आहे.त्यासाठी त्यांनी युक्रेन गाठले होते. मात्र, युक्रेन रशिया युध्दामुळे मायदेशी परतलेल्या या भावंडांना आपल्या पुढच्या शिक्षणाची चिंता सतावत आहे. आमच्या शिक्षणाची जबाबदारी केंद्र शासनानी घ्यावी,अशी विनंती या भावंडांनी भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझी यांच्याकडे केली. वैभववाडी नगराध्यक्षा नेहा माईणकर, उपनगराध्यक्ष संजय सावंत आदी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news