रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा
कोकण किनारपट्टीलगत असलेल्या समृद्ध कांदळवन क्षेत्राच्या संवर्धन तसेच संरक्षणार्थ जैवविविधतेने नटलेले हे क्षेत्र वन आता विभागाकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. या नुसार कोकणातील सुमारे 25 हजार हेक्टर क्षेत्र वन विभागाकडे संपादन करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी 50 टक्के क्षेत्रावर वन विभगाच्या नोंदी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या प्रशासनाला अधिसूचनेद्वरे सूचित करण्यात आले आहे.
कोकणातील पर्यटनीयदृष्ट्या कांदळवन संरक्षित करताना रत्नागिरी जिल्ह्यात कांदळवन पार्कचा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. त्याचबरोबर कांदळवनांच्या क्षेत्रावर होणार्या अतिक्रमणामुळे किनारपट्टीलगत असलेले क्षेत्र लाटण्याचा आणि तेथील समृद्धी नष्ट करण्याच्या अनेक तक्रारी प्रलंबित आहेत. त्यामुळे येथील जैवविधता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. जागेच्या हव्यासापोटी कांदळवनांची कत्तल करुन अनेक प्रजाती नष्ट होऊ लागल्या आहेत. या संदर्भात अनेक खटले न्यायालयात प्रलंबित आहेत.
पर्यवारणीयदृष्ट्या निसर्गाचा समतोल ढासळत चालल्याची कैफियत अनेक पर्यावरणप्रेमी संस्थांनी मांडली असताना अशा स्थितीत आता ही समृध्द वनक्षेत्रे संरक्षण करण्यासाठी वन विभाग पुढे सरसावला आहे.
कोकण किनारपट्टी भागातील मुंबईसह पाच जिल्ह्यांमध्ये सुमारे 35 हजार हेक्टर क्षेत्रात कांदळवनाचा परिघ आहे. खारजमीन कायद्याप्रमाणे यापैकी साडेबारा हजार हेक्टर क्षेत्र क्षेत्र लागवडीखाली आहे तर उर्वरित क्षेत्रापैकी साडे अकरा हजार हेक्ट्रर क्षेत्र खासगीच्या नावाखाली अतिक्रमणित आहे. या अतिक्रण झालेल्या क्षेत्राचा ताबा मिळविण्यासाठी आता वन विभागाला कसरत करावी लागणार आहे.
आतापर्यंत कोकणातील साडेसात हजार हेक्टर क्षेत्राचा ताबा वन विभागाच्या नोंदीवर येऊन हस्तांतरित झाला आहे. रत्नागिरी तालुक्यात जुवे, कर्ला, चिंचखरी, सामेश्वर, गावखडी, नवानगर आदी भागातील सुमारे 245 हेक्टर क्षेत्रात वन विभागाची नोंदणी झाली आहे.