

कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या झाराप येथील बँक ऑफ इंडियाच्या एटीएम फोडण्याचा प्रयत्न बुधवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी केला. मात्र, एटीएम यंत्रणेची सतर्कता आणि कुडाळ पोलिसांच्या तत्काळ कारवाईमुळे हा प्रयत्न अपयशी ठरला. यामध्ये बँकेचे सुमारे 9 लाख 50 हजार रुपये वाचले असून, चोरटे मात्र अंधाराचा फायदा घेत पसार होण्यात यशस्वी झाले आहेत.
एटीएममध्ये घुसून गॅस कटर, एलपीजी गॅस सिलेंडर व इतर साहित्याचा वापर करून चोरट्यांनी एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, यंत्रणेकडून नोंद झाल्यानंतर नवी मुंबई येथील कंट्रोल रूमने त्वरित कुडाळ पोलिसांना संपर्क साधला. रात्री गस्त घालत असलेल्या पोलिसांनी काही वेळातच घटनास्थळी धाव घेतली.
पोलिस येत असल्याचा सुगावा लागताच चोरटे साहित्य टाकून घटनास्थळावरून पळून गेले. घटनास्थळी एक गॅस कटर, एलपीजी गॅस सिलिंडर, पाना, मास्क, हँडग्लोव्हज यांसह विविध साहित्य सापडले आहे. सीसीटीव्ही कॅमेरे झाकण्यासाठी चोरट्यांनी चिकटपट्टी लावल्याचे निदर्शनास आले. तसेच, चोरट्यांपैकी एक व्यक्ती टेहळणीसाठी थोड्या अंतरावर उभा असावा, असा पोलिसांना संशय आहे.
बँक ऑफ इंडियाच्या झाराप येथील एटीएममध्ये चोरीच्यावेळी सुमारे 9 लाख 50 हजार रुपयांची रोकड होती. बँकेचे अधिकारी गुरुप्रीत सिंग यांनी दिलेल्या तक्रारीवरून दोन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही गेल्या काही महिन्यांतील दुसरी घटना आहे. त्यावेळी पोलिसांनी काही आरोपींना ताब्यात घेऊन सुमारे दहा लाखांची रोकड हस्तगत केली होती. झारापमधील ही घटना घडताना संबंधित ठिकाणी सुरक्षा रक्षक नव्हता, हे विशेष. त्यामुळे पोलिसांनी आता त्या ठिकाणी तत्काळ सुरक्षा रक्षक नेमण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दरम्यान, या घटनेबाबत ठसे तज्ञ व श्वानपथकाची मदत घेण्यात आली असून, सहायक पोलिस निरीक्षक वैशाली अडकूर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
यापूर्वीही झाला होता एटीएम फोडीचा प्रयत्न
कुडाळ शहरातील असाच एक एटीएम गेल्या काही महिन्यांपूर्वी चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यावेळी एटीएम यंत्रणा व पोलिस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे काही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले होते. तसेच, सुमारे दहा लाख रुपयांची रक्कमही हस्तगत करण्यात आली होती. झाराप येथील घडलेली घटना ही त्याचप्रकारची पुनरावृत्ती असून, यावेळी चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले असले, तरी सुदैवाने एटीएममधील 9 लाख 50 हजार रुपयाची रोकड सुरक्षित राहिली आहे.