Kudal News | नारूर- सरनोबतवाडी कॉजवे गेला वाहून
Recurring Monsoon Damage
कुडाळ : दोन दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीत नारूर येथील मुख्य रस्ता ते सरनोबतवाडी शाळेकडे जाणारा कॉजवे वाहून गेला. दरम्यान, सरनोबतवाडीकडे जाणारा दुसरा साकव गेल्या वर्षी वाहून गेला होता. याचा फटका येथील नागरिकांना सहन करावा लागत आहे. गेल्या दोन दिवसांपासून कोसळणार्या पावसामुळे नारुर-समतानगरकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेला होता.
समता नगरकडे जाणार्या कॉजवेची उंची कमी असल्याने दरवर्षी या ठिकाणी पुलावर पाणी येते. यंदाही मान्सूनच्या सुरुवातीलाच येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागला. ग्रामपंचायती तर्फे यंदा गाळ काढण्यात आला होता. मात्र तरीही याठिकाणी पाणी साचले. येथील पुलाची उंची वाढवावी अशी मागणी केली जात आहे.
दरम्यान सरनोबतवाडी शाळेकडे जाणारा मार्गावरील कॉजवे पुरात वाहून गेल्याने ग्रामस्थ व विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. हा कॉजवे लवकरात लवकर दुरुस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

