

दोडामार्ग : वझरे येथील तीव्र वळणावर दोन मालवाहू वाहनांना एका पाठोपाठ अपघात झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. यातील एक वाहन पलटी झाले असून दुसरे वाहन रस्त्याबाहेर गेले आहे. हे वळण अपघात प्रवण ठिकाण बनले असून, मागील पंधरा दिवसांमध्ये येथे तब्बल सात वाहनांचे अपघात झाले आहेत.
वझरे येथील एका वळणावर अपघातांची मालिका सुरू आहे. तीव्र वळणाचा अंदाज वाहन चालकांना येत नसल्याने अपघात होत आहे. प्रत्येक अपघातात वाहने वळणावरून घसरून खाली जाऊन घळणीमध्ये पलटी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मंगळवारी सकाळी एक टेम्पो आयी ते दोडामार्ग येत होता. या तीव्र वळणावर चालकाचा अंदाज चुकला अन् टेम्पो थेट रस्त्यालगतच्या बाजू पट्टीवर पलटी झाला. काही वेळाने त्या मागोमाग येणार्या महिंद्रा बोलेरो पिकअपला अपघात झाला. अपघाताची माहिती स्थानिकांना समजताच ते मदत कार्यासाठी सरसावले.
जेसीबी आणून पलटी झालेला टेम्पो सरळ केला. या अपघातात टेम्पोचे मोठे नुकसान झालेे. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. या वळणावर वारंवार अपघात होत असून काही अपघातांमध्ये वाहनचालक व प्रवासी किरकोळ जखमी झालेत तर दोन अपघात गंभीर स्वरूपाचे असल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिकांनी या वळणावर वारंवार घडणार्या अपघातांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. संबंधित ठिकाणी चेतावणी फलकांचा अभाव, अंधार्या वेळी अपुरी प्रकाश व्यवस्था आणि वेगावर नियंत्रण नसणे ही अपघातांना कारणीभूत ठरत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
वळणावर अपघात टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात. स्पीड ब्रेकर बसवावेत अशी मागणी होत आहे. स्थानिक प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन त्वरित कारवाई करावी, अन्यथा जनआंदोलन छेडण्याचा इशाराही काही नागरिकांनी दिला आहे.