

दोडामार्ग ः दोडामार्ग नगरपंचायतीत प्रारूप विकास आराखडा (योजना) संदर्भात हरकतींची सुनावणीवेळी उपस्थित नागरिकांनी कडाडून विरोध केला. एकाही नगरसेवकाच्या जमिनीत ग्रीन झोन कसा नाही? आणि आम्हा सामान्य नागरिकांच्या जमिनीतच ग्रीन झोन कसे?असा सवाल नागरिकांनी केला. हा मनमानी आराखडा आम्हाला मान्य नसून तो रद्द करावा व नव्याने बनवावा, अशी मागणी केली.
सुनावणीवेळी नागरिकांना आवश्यक उत्तरे न मिळाल्याने नगराध्यक्ष चेतन चव्हाण व अधिकारी यांच्यासोबत नागरिकांची शाब्दिक बाचाबाची झाली. प्रकरण हमरातुमरीवर आले, मात्र पोलिसांनी मध्यस्थी केल्याने ते निभावले. यावेळी शंभराहून अधिक हरकती दाखल झाल्या आहेत.
नगरपंचायत कार्यालयात गुरूवारी प्रारूप विकास आराखडा संदर्भातील हरकतींच्या अनुषंगाने सुनावणी आयोजित करण्यात आली होती. या अनुषंगाने शुक्रवारी 13 रोजी सुनावणी होणार आहे. यावेळी नगराध्यक्ष चेतन चव्हाण, उपनगराध्यक्ष देवीदास गवस, बांधकाम सभापती रामचंद्र मणेरीकर, मुख्याधिकारी संकेत गायकवाड, सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ.जय सामंत, सेवानिवृत्त सहा. संचालक नगर रचना विभाग अनिलकुमार पाटील व सेवानिवृत्त नगर रचनाकार शेखर चव्हाण आदी उपस्थित होते.
आयाखड्याबाबात हरकती घेण्यास सुरूवात झाली. उपस्थित नागरिकांनी अनेक सवाल करत नगरपंचायत प्रशासनाला कैचीत पकडण्यास सुरूवात केली. नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी नागरिकांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांच्या प्रश्नांचे निरसन न झाल्याने ते संतप्त झाले. संदीप गवस म्हणाले, आमच्या जमिनी वडिलोपार्जित आहेत.
आमचा विकासाला विरोध नाही, पण आमच्या जमिनी बळकावून, हिसकावून किंवा चुकीच्या पद्धतीने त्या घेऊन विकास करू नये. शिवाय आमच्या सातबार्यावर ग्रीन झोनचा उल्लेख नसताना प्रारूप विकास आराखड्याच्या मॅपवर आमच्या जमिनींवर ग्रीन झोन आलाच कसा? नगरपंचायत कडून अशाप्रकारे आमचे नुकसान करून जर विकास करत असाल तर त्यापेक्षा आमची पूर्वीची ग्रामपंचायतच राहुदे आम्हाला नगरपंचायत नको? असे सांगून प्रारूप आराखड्यावर संताप व्यक्त करत त्याला हरकत घेतली. यावेळी उपस्थित अन्य नागरिकांनी देखील त्यांना सहमती दर्शव्य प्रारूप आराखड्याला विरोध दर्शविला.
नगरपंचायत मध्ये सतरा नगरसेवक आहेत, त्यापैकी एकही नगरसेवकांच्या जमिनीत ग्रीन झोन कसे नाही? फक्त सामान्य नागरिकांच्या जमिनीतच कसे ग्रीन झोन घालण्यात आले? असा सवाल संदीप गवस यांच्याकडून विचारण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष चव्हाण म्हणाले, ग्रीन झोन वनविभाग जाहीर करते. तो आम्ही घालत नाही असे स्पष्ट केले. यावर नागरिकांचे समाधान झाले नाही. नागरिकांना विश्वासात घेऊन नवीन आराखडा बनवा, अशी मागणी नागरिकांनी केली.
प्रारूप विकास आराखड्याच्या मुद्द्यांवरून संतप्त नागरिकांनी नगरध्यक्ष चेतन चव्हाण व अधिकारी यांच्या व्यासपीठाच्या जवळ येत आक्षेप घेतले. शिवाय त्या ठिकाणी मोठ मोठ्याने बोल्याने वादंग निर्माण होण्याचा प्रकार घडला. त्यावेळी नगरध्यक्ष चव्हाण यांनी देखील आपण सर्वांच्या हरकतींचे निरसन करण्यास सक्षम असून न्याय देणार आहे. यावर आम्हाला तुमचा न्याय नको , हा प्रारूप विकास आराखडाच रद्द करा, अशी मागणी नीलेश गवस, संदीप गवस, दीपक म्हावळंकर केली. मात्र नगरध्यक्ष चव्हाण म्हणाले की, तुम्ही एका, एकाने येत शांततेत तुमचे म्हणणे मांडा. आम्ही त्याचे निरसन करू असे स्पष्ट केले.