

दोडामार्ग : आंबडगाव खालचीवाडी ते देऊळवाडी या दोन वाड्यांना जोडणार्या पुलाचा पर्यायी रस्ता अतिवृष्टीमुळे वाहून गेला. यामुळे संतप्त ग्रामस्थ व महिलांनी ठेकेदाराला जाब विचारला असता त्याच्या कर्मचार्यांनी तुम्ही अडाणी असे संबोधून त्यांना हिणावले. त्यामुळे त्या अधिकच आक्रमक झाल्या. महिला व ठेकेदार यांच्यात शाब्दिक बाचाबाची होऊन वातावरण तणावाचे झाले. दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी सार्व. बांधकाम शाखा अभियंता संभाजी घंटे यांना बोलावून घेत सर्व प्रकार सांगितला. तसेच महिलांना हिणावल्यास शिवाय दबाव तंत्र वापरल्यास तुमची गय केली जाणार नसल्याचे सांगत पालकमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आंबडगाव या ठिकाणी खालचीवाडी व देऊळवाडी या वाड्यांना जोडणार्या पुलाचे काम मंजूर झाले. या पुलाचे काम करताना ठेकेदाराने पर्यायी रस्ता केला. कामाला सुरुवात झाली. मात्र काम अतिशय कुर्मगतीने होत राहिले. त्यामुळे पावसाळा येऊनही पुलाचे काम सुरूच होते. रविवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे या पुलाचा पर्याय रस्ता वाहून गेला व दोन वाड्यांचा संपर्क तुटल्याने ग्रामस्थ व विद्यार्थ्यांची परवड झाली.
कामाला जाणारे नागरिक, शाळेत जाणारी मुले गावातच अडकून पडली. यावेळी पालकांनी संबंधित विभाग व ठेकेदारावर तीव्र संताप व्यक्त केला. दरम्यान दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण व सहकारी घटनास्थळी पोहोचले. यावेळी महिलांनी नगराध्यक्षांना सर्व कथनी सांगितली. ठेकेदाराचा एक कर्मचारी आम्हा महिलांना अडाणी म्हणून हिणावतो,असे सांगताच नगराध्यक्ष चव्हाण संतापले. त्यांनी संबंधित कर्मचारी व ठेकेदाराला तेथेच जाब विचारला. शिवाय शाखा अभियंता संभाजी घंटे यांना बोलावून आजच्या आज रस्ता खुला करून देण्याची मागणी केली. या कामाचा ठेकेदार कोण? तसेच महिलांसोबत उद्धट वर्तणूक कराल अजिबात खपवून घेणार नाही असा इशारा दिला. भाजप शहराध्यक्ष राजेश फुलारी, रंगनाथ गवस, पिकी कवठणकर आदी उपस्थित होते.
ठेकेदार व कामगारांचा मनमानी कारभार व महिलांशी उद्धट वर्तणूक पाहून या ठेकेदारांना कोणतीही कामे देऊ नका. त्यांना काळ्या यादीत टाका, अशी मागणी संतप्त महिलांनी शाखा अभियंता संभाजी घंटे यांच्याकडे केली. महिलांचे रौद्ररूप पाहून संभाजी घंटे यांना काय बोलावे ते सुचत नव्हते.
पर्यायी रस्ता वाहून गेल्याने दोन वाड्यांचा संपर्क तुटला. पर्यायी रस्ता नसल्याने ग्रामस्थांची तारांबळ उडाली. परिणामी सोमवारी पहिल्या दिवशी शाळेला जाण्यासाठी उत्साहात घराबाहेर पडलेली मुले पुलाच्या एका बाजूला अडकून राहिली. शाळेत जाण्यासाठी पर्यायी मार्ग नसल्याने मुलांना पहिल्याच दिवशी शाळेला मुकावे लागलेे.