

कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गाची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. आता गणेशोत्सव तोंडावर आला तरी महामार्गाची डागडुजी हायवे प्राधिकरणकडून करण्यात आलेली नाही. साहजिकच गणेशभक्तांना या खड्डेमय महामार्गावरून प्रवास करत गाव गाठावे लागणार आहे, असा आरोप करत ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कुडाळ-हुमरमळा येथे बुधवारी भर पावसात महामार्गावर ‘रास्ता रोको’ आंदोलन छेडले. यामुळे महामार्गाच्या एका लेनवरील वाहतूक दहा ते पंधरा मिनिटांसाठी ठप्प झाली होती. यावेळी ‘महायुती’ सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांनी माजी आ. वैभव नाईक, परशुराम उपरकर यांच्यासह 19 प्रमुख मंडळींना ताब्यात घेत सिंधुदुर्गनगरी पोलिस स्थानकात नेलेे व नंतर सोडून दिले.
जिल्हाप्रमुख संदेश पारकर, सतीश सावंत, जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, मंदार शिरसाट, अमरसेन सावंत, संतोष शिरसाट, जयभारत पालव, राजन नाईक, अतुल बंगे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख श्रेया परब, श्रेया दळवी, बबन बोभाटे, राजू राठोड, राजेश टंगसाळी, बाळा कोरगावकर,अवधूत मालंडकर आदींसह पक्षाचे तालुकाप्रमुख, विभाग प्रमुख, शाखाप्रमुख व शेकडो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.
बुधवारी सकाळपासूनच जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू होती. या भर पावसातच ठाकरे गटाचे पदाधिकारी व शिवसैनिकांनी महामार्गावर ठिय्या मांडला होता. महामार्गावर राणे बस स्टॉप नजीक छोटेखाणी व्यासपीठ तयार करण्यात आले होते. व्यासपीठावर ‘मुंबई -गोवा महामार्ग अपूर्ण ठेवणार्या महायुती सरकारचा निषेध असो’ असे लिहिलेला लक्षवेधी बॅनर लावण्यात आला होता. सर्व प्रमुख नेते व उपस्थित पदाधिकारी, शिवसैनिकांच्या गळ्यात पक्षाचे चिन्ह असलेले भगवे शेले होते तर हातात महायुती सरकारच्या विरोधातील बॅनर झळकत होते. यावेळी महायुती सरकार विरोधात शिवसैनिकांनी जोरदार घोषनाबाजी केली.
आंदोलनासाठी माजी आ.वैभव नाईक, माजी आ. परशुराम उपरकर, जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी सर्वांच्या आधी हजर झाले होते, त्यानंतर काही वेळातच जिल्हाप्रमुख संदेश पारकर, सतीश सावंत, सुशांत नाईक यांनी हजेरी लावल्यानंतर आंदोलनाला सुरुवात झाली. सर्वच प्रमुख मंडळींनी महायुती सरकारच्या नाकर्तेपणाचा पाढा वाचला. जिल्ह्यात आलेले महसूल मंत्री हे जमिनीची खरेदीखते करण्यासाठी आल्याची जोरदार टीका प्रमुख मंडळींनी केली. गेल्या दहा वर्षात या महामार्गावर 4 हजार जणांचे बळी गेले आहेत.त्यामुळे मुंबई-गोवा महामार्ग तात्काळ पूर्ण करावा, अशी मागणी यावेळी केली.
वैभव नाईक म्हणाले, आमच्या आंदोलनाची माहिती मिळताच मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज या महामार्गप्रश्नी बैठक आयोजित केली आहे, दुसरीकडे सिंधुदुर्गात महामार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले; हीच कामे गेल्या वर्षभरात का केली नाहीत? दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या बैठकीला कोकणातील दोन्ही मंत्र्यांना बोलवले नाही; म्हणजेच हे दोन्ही मंत्री काही कामाचे नाहीत, हे त्यांनाही समजले आहे, असा टोला त्यांनी लगावला.
मुंबई-गोवा महामार्गाला टक्केवारीमुळे खड्ड्यांचे ग्रहण लागले आहे, हेच आताच्या पालकमंत्र्यांचे कर्तुत्व आणि कार्य आहे. कणकवली बाजारपेठ मध्ये न्यायालयांच्या आदेशाचे अवमान होत आहे, तरीसुद्धा त्याकडे कुणी ढुंकुनही पाहत नाही. काही ठिकाणी आरो लांईनच्या बाहेरची बांधकामे काढली जात असतील तर ती बांधकामे सर्वांचीच काढा.आम्हाला प्रशासनाने केसेसची धमकी देऊ नये,आम्हाला केसेसची सवय आहे,आता आधी महामार्गाचे काम वेळीच पूर्ण करावे,अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडले जाईल असा निर्वाणीचा इशारा माजी आ. परशुराम उपरकर यांनी दिला.
जिल्हाप्रमुख संदेश पारकर, बाबुराव धुरी, सतिश सावंत, सुशांत नाईक, सौ. श्रेया परब, अमरसेन सावंत, अंतुले बंगे, यांनी मनोगते व्यक्त करून सरकारवर टीकास्त्र सोडले. यावेळी उपस्थित महामार्ग प्राधिकरणच्या कार्य. अभियंता अनामिका जाधव यांच्याशी वैभव नाईक, परशुराम उपरकर, सतीश सावंत व संदेश पारकर यांनी चर्चा केली. गणेशोत्सवापूर्वी रस्ता वाहतुकीस सुस्थितीत व्हावा, अशी मागणी केली, अन्यथा पुन्हा आंदोलन केले जाईल असा इशारा दिला. आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सिंधुदुर्गनगरीचे सहा.पोलीस निरीक्षक शेखर लव्हे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचा चोख बंदोबस्त सज्ज होता.
मुंबई -गोवा महामार्गावरील खड्ड्यांच्या दुरावस्थेबाबत ठाकरे पक्षाच्या वतीने हुमरमळा येथे आंदोलन करण्यात आले; यावेळी तालुकाप्रमुख राजन नाईक यांनी दुग्धाभिषेक करुन व रांगोळी काढून सरकारचा निषेध केला.
मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण संदर्भात उबाठा पक्षाच्यावतीने बुधवारी आंदोलना दरम्यान आंदोलकांनी कुडाळ ते ओरोसकडे जाणार्या महामार्गाच्या लेंन वर ठिय्या मांडला. त्यामुळे कुडाळ वरून ओरोसच्या दिशेने जाणारी वाहने पोलिसांनी रोखून धरली, परिणामी महामार्गाच्या एका लेनवर ट्राफिक जाम झाले मात्र ओरोस ते कुडाळ ही लेन काही अंशी सुरू होती.पोलिसांचा फौजफाटा मोठा असल्याने अवघ्या पंधरा ते वीस मिनिटात आंदोलकांना ताब्यात घेत पोलीस व्हॅन मधून ओरोस पोलिसा स्थानकात हलविले. आंदोलन तसे शांततेत पार पडले.त्यामुळे पोलीस यंत्रणेवरील ताण कमी झाला. यावेळी आंदोलकांनी महायुतीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
महामार्ग चौपदरीकरण संदर्भात उबाठा पक्षाच्यावतीने जिल्हा दौर्यावर आलेले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सिंधुदुर्गनगरीत माजी आ. वैभव नाईक यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली व चर्चा केली. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना फोनवरून संपर्क साधत वैभव नाईक यांचे ना.बावनकुळे यांनी बोलणे करून दिले. येत्या तीन महिन्यात महामार्गाचे काम पूर्ण केलं जाईल, अशी ग्वाही ना. गडकरी यांनी वैभव नाईक यांना दिली.