

कुडाळ : पिंगुळी -म्हापसेकरतिठा येथील संजना कलेक्शन या कपड्याचे दुकान फोडून आतील ब्युटीपार्लरचे सामान, राखी यासह सुमारे 37 हजाराचे साहित्य अज्ञाताने चोरून नेले. ही घटना सोमवारी रात्री घडली.
या घटनेची फिर्याद आरती संजय परब (रा. देवुळवाडी- पिंगुळी) यांनी कुडाळ पोलिसात दिली. 20 जुलै रोजी आरती परब या नेहमी प्रमाणे रात्रौ 9 वा. दुकान बंद करून घरी गेल्या. सोमवारी दुकान बंद होते. मंगळवार 22 जुलै रोजी स. 11 वा.त्यांनी दुकान उघडले असता दुकानाचे सिलींग तुटून लटकत असलेले त्यांना दिसले. तसेच दुकानात पावसाचे पाणी भरलेले होते.
त्यानंतर त्यांनी दुकाना शेजारी असलेल्या ब्युटीपार्लर व कॉस्मँटीक गाळ्याचा दरवाजा उघडला असता पार्लर मधील सामान अस्ताव्यस्त पसरल्याचे तर काही सामान जागेवर नसल्याचे दिसून आले. त्यांनी आजुबाजुला पाहिले असता ब्युटी पार्लरच्या मशिन, कॉस्मँटीक सामान, राख्या चोरीस गेल्याचे निर्दशनास आले. कोणीतरी अज्ञाताने कापड दुकानाच्या छप्पराचे सिमेंटचे पत्रे तोडून त्यावाटे आत प्रवेश करून ही चोरी केल्याचे त्यांच्या लक्षात आले.
चोरीला गेलेल्या साहित्यामध्ये 20 हजार रुपये किंमतीचे ब्युटीपार्लचे साहित्य, बँन्टेक्सच्या बांगड्या, राख्या असे एकुण 37 हजाराचे साहित्य चोरीला गेले. कापड दुकानातील एका दरवाजातून ब्युटीपार्लर, कॉस्मँटीक दुकानात जाता येते. चोरट्याने याच संधीचा फायदा घेत दोन्ही दुकानातील साहित्य चोरी केली. काही महिन्यापूर्वीही हेच दुकान अशाच प्रकारे फोडून अज्ञात चोरट्याने आतील रोख रक्कम चोरून नेली होती.