

कुडाळ : सिंधुदुर्गात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या डोळ्यांदेखत अवैध दारू विक्री व वाहतूक सुरू आहे. याबाबतचा जाब विचारण्यासाठी मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी सोमवारी मनसे पदाधिकार्यांसह थेट राज्य उत्पादन शुल्क, कुडाळ कार्यालयावर धडक देत गोवा दारूच्या बाटल्यांचा हार निरीक्षकांच्या टेबलवर ठेवून प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा उपरोधिकपणे निषेध केला. दरम्यान अश्या अवैध दारू विक्रेत्यांची यादी दुसर्यांदा अधिकार्यांना देत, याबाबत सात दिवसात कारवाई करण्याची मागणी केली असल्याचे धीरज परब यांनी सांगितले.
चार महिन्यांपूर्वी मनसे पदाधिकार्यांनी कुडाळ तालुक्यात अवैध दारू विक्रीची ठिकाणे आणि त्यामागे कार्यरत यंत्रणांची सविस्तर माहिती लेखीपत्र देवुन दिली होती. परंतु चार महिने उलटून सुद्धा संबंधितांवर कारवाई न होता ते राजरोसपणे गोवा दारू विकत आहेत. या विरोधात सोमवारी आंदोलन करण्यात आले व दुसर्यांदा अवैध दारु विक्रेत्यांची यादी उत्पादन शुल्क विभागाकडे नव्याने देण्यात आली.
मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब, जिल्हा उपाध्यक्ष कुणाल किनळेकर, तालुकाध्यक्ष हेमंत जाधव, तालुका उपाध्यक्ष जगन्नाथ गावडे, गजानन राऊळ, अविनाश अणावकर, विभाग अध्यक्ष प्रथमेश धुरी, शाखा अध्यक्ष अनिकेत ठाकूर, महाराष्ट्र सैनिक सूरज नेरूरकर, विष्णू मसके, वल्लभ जोशी, रोशन ठाकूर आणि अजय जोशी यांसह महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.