सिंंधुदुर्गः अकरा वर्षे रखडलेला मुंबई -गोवा महामार्ग आणि महामार्गावर पडलेल्या खड्डयांबाबत सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना ठाकरे पक्षाने आक्रमक पवित्रा घेत माजी आ.वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी सकाळी हुमरमळा येथे महामार्गावर चक्का जाम आंदोलन केले.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे सिंधुदुर्ग जिल्हा दौर्यावर आले असता त्यांनी वैभव नाईक यांच्यासह शिवसेना शिष्टमंडळाला सिंधुदुर्गनगरी येथे बोलावून घेत त्यांच्यासमवेत बैठक घेतली. तसेच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी फोनवर चर्चा करून शिवसेना शिष्टमंडळाची मागणी त्यांच्यापर्यंत पोहचविण्यात आली.
यावेळी वैभव नाईक यांनीही ना. नितीन गडकरी यांच्याशी रखडलेल्या महामार्गाबाबत फोनवर चर्चा केली. त्यावर ना. गडकरी यांनी प्रलंबित कामाबाबत लवकरच आढावा बैठक घेऊन मुंबई गोवा महामार्ग पूर्ण करू असे आश्वासित केले. जिल्हाधिकारी अनिल पाटील, पोलीस अधीक्षक मोहन दहीकर,जि. प. सीईओ रवींद्र खेबुडकर, कुडाळ प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे आदी अधिकारी उपस्थित होते. मुंबई- गोवा महामार्गाची चाळण झाली आहे. पनवेल ते बांद्यापर्यंत सर्वच ठिकाणी खड्डे पडले आहेत.गेल्या वर्षी गणेशोत्सवापूर्वी हा महामार्ग पूर्ण करणार असे महायुती सरकारने आश्वासन दिले होते. मात्र यावर्षीचा गणेशोत्सव आला तरी महामार्ग पूर्ण झालेला नाही. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने हे रास्तारोको आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनाला शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व जिल्हावासियांचा उत्स़्फुर्त प्रतिसाद लाभला.आंदोलकांनी रस्त्यावर बसून सुमारे अर्धा तास महामार्ग रोखून धरला.
मुंबई -गोवा महामार्गाचे काम सुरु होऊन 11 वर्षे झाली तरी हा महामार्ग पूर्ण झालेला नाही. महामार्गावर झालेल्या अपघातात 4 हजार कोकण वासियांचे बळी गेले आहेत. आम्ही रास्ता रोको आंदोलन करणार हे जाहीर केल्यानंतर पालकमंत्र्यांनी 15 ऑगस्ट पूर्वी महामार्गावरील खड्डे बुजवू असे सांगितले. त्याप्रमाणे आमच्या आंदोलन स्थळावरील खड्डे चार दिवसापूर्वी बुजविले, मात्र आज पुन्हा याठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे तुम्ही कितीही थुक पट्टी केली तरी तुमचे चेहरे, तुमचे विचार खड्यांच्या निमित्ताने रस्त्यावर दिसत आहेत.
माजी आ. वैभव नाईक शिवसेना ठाकरे गट