

Tondavali Talashil Beach
आचरा: मुसळधार पाऊस व समुद्राला असलेल्या उधाणाचा फटका तळाशील समुद्र किनारपट्टीला बसत आहे. तळाशील किनारपट्टीचा बंधारा नसलेल्या भागाचा अंदाजे पंधरा ते वीस फूट भूभाग समुद्राने गिळंकृत केल्याने तळाशील मुख्य रस्ता आणि समुद्र यामध्ये दहा ते पंधरा फूटाचे अंतर राहिले आहे. यामुळे तळाशील भागाला धोका निर्माण झाला होता. याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती.
या पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी तळाशील समुद्र किनारपट्टी भागाची पाहणी करत किनाऱ्यास सुरक्षित करण्याची हमी दिली होती. सामंत यांनी आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून ढासळत असलेल्या भुभागाला बंधारा घालण्याच्या कामाची सुरूवात ग्रामस्थांच्या उपस्थितीत केली. बंधारा घालण्याचे काम हाती घेतल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
तळाशील येथील किनारपट्टीला धोका निर्माण झाल्यानंतर दत्ता सामंत यांनी आमदार निलेश राणे यांना संपर्क साधून माहिती दिली होती. किनारपट्टीचे संरक्षण आणि ग्रामस्थांची सुरक्षितता सर्वात महत्वाची असल्याने आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल असे आश्वस्थ राणे केले होते. त्यांच्या सुचनेनुसार राणेंच्या स्वखर्चातून दत्ता सामंत यांनी तातडीने बुधवार पासून तळाशील किनारपट्टीवर दगड पसरून किनारपट्टी सुरक्षित करण्यासाठी बंधारा घालण्याचे काम हाती घेऊन उपाययोजना सुरु केल्या होत्या.
यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या समवेत शिवसेना तालुका प्रमुख राजा गावडे, दीपक पाटकर, तोंडवळी सरपंच नेहा तोंडवळकर, आचरा सरपंच जेरॉन फर्नांडीस, माजी सरपंच संजय केळुसकर, जयहरी कोचरेकर, पांडुरंग शेलटकर, चेतना फायबरचे संजय तारी, डॉ. प्रमोद कोळंबकर, जयप्रकाश परुळेकर, मुजफ्फर मुजावर, अभिजित सावंत, चंद्रकांत कदम, भुपाळ मालंडकर, राधाकृष्ण टिकम, प्रकाश बापर्डेकर, बबन रेवंडकर, गौरव मालंडकर, कुणाल पाटकर, झकास खवणेकर, स्नेहा कांदळगावकर,जान्हवी पराडकर, विनया रेवंडकर, प्राची बापार्डेकर, गौरवी पाटकर आदी उपस्थित होते.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सामंत म्हणाले की, युती शासनाच्या काळात सातशे तीस मीटरच्या बंधाऱ्यांची टेंडर प्रकिया मंजूर झालेली आहे. खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे व महायुतीच्या सरकारकडून 12 कोटी पेक्षा जास्त निधी या गावाला देण्यात आलेला आहे. आणखी या पुढचा दीड किलोमीटर बंधारा मंजूर झालेला आहे.