

कुडाळ : चाकरमान्याच्या दिमतीला एसटी बसेस मात्र कोकणसीयाच्या नशिबी ऐन चतुर्थीत पायपीट अशी स्थिती सद्यस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाहायला मिळत आहे. मुंबईकरांच्या सोयीसाठी एसटी प्रशासनाने काही गाड्या मुंबईला पाठवल्या आहेत त्यामुळे स्थानिक काही गाड्या रद्द केले आहेत. मात्र यामुळे ऐन चतुर्थीच्या काळात ग्रामीण भागातील एसटीचे वेळापत्रक कोलमडले असल्याने बाजार खरेदीसाठी जाणार्याच्या नशिबी पायपिट आल्याचे दिसत आहे.
कुडाळ आगाराने तालुक्यातील 52 फेर्या बंद केल्या आहेत. या एकाच आगारातून दहा एसटी बस मुंबईला पाठवण्यात आले आहेत. यामध्ये काही लांब पल्ल्याच्या तर काही स्थानिक गाड्यांचाही समावेश आहे. सद्यस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेश चतुर्थीची मोठी धामधूम सुरू आहे. गणेश चतुर्थीचा सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने सर्वत्र मोठ्या प्रमाणात खरेदी चालू आहे. एसटीला ग्रामीण जीवनाची रक्तवाहिनी असे संबोधले जाते. ग्रामीण जनतेची बहुतांशी मदार ही एसटी सेवेवरच अवलंबून असते. सद्यस्थितीत दुचाकी व चार चाकी वाहनांची संख्या वाढली असली तरी अनेकजण एसटीचा प्रवास सुरक्षित मानत आहेत.
बाजार खरेदीसाठी एसटी हा एक उत्तम पर्याय मानला जात आहे. खरेदी केलेल्या बाजार वाढत्या महागाईमुळे रिक्षातून आणणे परवडणारे नसल्याने अनेक जण एसटीतूनच खरेदीचे सामान आणत आहेत. असे असताना एसटी प्रशासनाने मात्र उत्पन्नाचा विचार करून अनेक बसलेल्या बंद करून त्या मुंबईला पाठवल्याने ग्रामीण जनतेचे जीवन बर्याच प्रमाणात कोडमडले आहे. त्यामुळे काही ठिकाणी ग्रामीण भागात एसटी बस न आल्याने पायपीट करण्याची ही वेळ आली आहे. जसे ग्रामीण भागातील जनतेची मदार ही एसटीवर अवलंबून असते तसेच वर्षभर एसटी प्रशासनाला साथ देणारी ग्रामीण भागातील जनता असते. भाडेवाढ झाली तरी ग्रामीण भागातील जनता एसटीनेच प्रवास करते. असे असताना एसटी प्रशासन मात्र एसटी प्रशासनाला चांगलीच साथ देणार्या ग्रामीण भागातील प्रवाशांचा कोणताही विचार न करता स्वहिताचा विचार करत असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
एसटी प्रशासनाने गणेश चतुर्थी असो वा इतर कोणताही उत्सव असो यासाठी हव्या त्या ठिकाणी गाड्या अवश्य पाठवाव्यात मात्र वर्षभर साथ देणार्या प्रवाशांची गैरसोय करून एसटी बसेस ऐन सणासुदीच्या काळात बाहेर पाठवणे म्हणजे प्रवाशांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखेच आहे. एसटी प्रशासनाने अशावेळी ज्यादा गाड्या बाहेर पाठवण्यासाठी ज्यादा गाड्यांची तरतूद करून ठेवणे आवश्यक आहे. एसटीला अशा प्रवासामधून मोठे उत्पन्न मिळत असल्याने नवीन गाड्यांची मागणी व तरतूद करणे हे फायदेशीर ठरणार आहे. यामुळे एसटीला उत्पन्न तर मिळणार आहे शिवाय ग्रामीण जनतेची होणारी गैरसोय पण टळणार आहे.
गेले कित्येक वर्ष हाच प्रकार चालू असून अनेक ग्रामीण भागातील प्रवाशांना ऐन सणासुदीच्या काळात पायपीट करण्याची नमुष्की ओढवते. मात्र याचे एसटी प्रशासनाला कोणतेच सोयर सुतक नाही का असा प्रश्नही प्रवाशांमधून केला जात आहे. याची दखल एसटी प्रशासनाने तात्काळ न घेतल्यास प्रवासी वर्ग आता आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.