

नेवरी : शाळेचे ऋण फेडण्यासाठी नेवरी येथील जिल्हा परिषद शाळेचे माजी विद्यार्थी चांगदेव शिवाजी महाडिक यांनी एक ग्रंथालय माँ के नाम हा अभिनव उपक्रम राबवला. आईच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने स्वखर्चाने त्यांनी आपल्या शाळेला सावित्री शिवाजी महाडिक डिजिटल ग्रंथालयाची भेट दिली.
आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या खेड्यातील विद्यार्थ्यांना जि. प. शाळेतून शिक्षण घेत असताना संघर्षाचा प्रवास करावा लागतो. हा संघर्ष माझ्या गावातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या वाट्याला येऊ नये, यासाठी आईच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने दोन लाख पंच्याहत्तर हजार पाचशे पंचावन्न रुपये खर्चून सर्वसामान्य मुलांच्या आधुनिक शिक्षण स्पर्धेसाठी सुसज्ज ग्रंथालय उभारले. शाळेच्या विद्यार्थ्यांना ग्रंथालयाची सुविधा उपलब्ध करून देऊन जि. प. राज्यस्तरीय मॉडेल स्कूलचे वैभव वाढविले असल्याचे महाडिक यांनी सांगितले.
खेड्यामधून आजही सर्वसामान्यांची शाळा म्हणून जि. प. शाळेकडे पाहिले जात आहे. याच शाळेतून नशिबाच्या जोरावर नाममात्र शिक्षण घेऊनही काहीजण गलाई व्यवसायात शेठ झाले, तर कोणी बुद्धिप्राविण्य होऊन अधिकारी झाले. परंतु पुन्हा शाळेकडे मागे वळून जि. प. शाळेला मदतीचा हात पुढे करणारे अगदीच कमी विद्यार्थी दिसून येतात. आपल्या शाळेचे ऋण फेडण्यासाठी शाळेला ग्रंथालयाचीच भेट देणारे विद्यार्थी या परिस्थितीत आदर्शवत असल्याची आणि इतरांनीही याचा आदर्श घ्यावा, अशी भावना पालकांमधून व्यक्त झाली.