Snake Bite | सिंधुदुर्गात निसर्ग अन् सापांचा अधिवास; सर्पदंशाचा धोका टाळण्यासाठी 'अशी' घ्या काळजी

Snake Bite | सरकारी रुग्णालय यंत्रणा मात्र सज्ज : सिंधुदुर्गात 99.88 टक्के रुग्ण सुखरूप
Snake Bite
Snake BitePudhari
Published on
Updated on

कुडाळ : प्रमोद म्हाडगुत
महाराष्ट्र राज्याच्या दक्षिण टोकाला असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला निसर्गाने समृद्ध वनसंपदा, आंबा-काजूच्या बागा आणि डोंगर-दर्यांची मोफत देणगी दिली आहे. मात्र, या घनदाट वनस्पती आणि आर्द्र हवामानामुळे हा परिसर विविध प्रजातींच्या सापांचा नैसर्गिक अधिवास मानला जातो. शेती, बागायती आणि लाकूडफाटा गोळा करण्यासाठी जंगलात जाणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांचा सापांशी थेट संपर्क येणे ही या भागातील नित्यनियमाची बाब आहे.

Snake Bite
Nilesh Rane : कुडाळ २१ व्या शतकातील शहर बनविण्याचा प्रयत्न!

त्याशिवाय घराच्या आजूबाजूला वाढलेली झाडी आणि घरातच वाढलेले अडगळीचे सामान यामुळे साप घरात घुसतात. सध्या सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यांचा काळ तर सर्पदंशाच्या दृष्टीने धोकादायक आहे. याच काळात सर्पदंश वाढतात. त्यामुळे लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
सर्पदंशाच्या घटना सिंधुदुर्गात सातत्याने घडत असतात. सप्टेंबर व ऑक्टोबर या महिन्यात या घटना अधिक घडतात. परंतु, गेल्या काही वर्षांत जिल्हा प्रशासन आणि सार्वजनिक आरोग्य विभागाने आखलेली चोख रणनीती, औषधांचा मुबलक पुरवठा आणि ग्रामीण स्तरावरील वैद्यकीय अधिकाऱ्यांची तत्परता यामुळे सर्पदंश आता या जिल्ह्यात जीवघेणा ठरत नाही, सर्पदंशाच्या हजारो घटनांनंतरही मृत्यूचे प्रमाण नगण्य ठेवण्यात आरोग्य यंत्रणेला मोठे यश आले आहे. प्राप्त शासकीय नोंदीनुसार, गेल्या साडेतीन वर्षांत जिल्ह्यात सर्पदंशाचे एकूण ३ हजार ३४६ रुग्ण नोंदवले गेले असून, योग्य वेळेत मिळालेल्या उपचारांमुळे ३ हजार ३४२ रुग्ण पूर्णपणे सुखरूप बचावले आहेत.

आरोग्य सुविधांची सक्षम साखळी
सर्पदंश झाल्यानंतर रुग्णाला सुरुवातीच्या एका तासात योग्य वैद्यकीय उपचार मिळणे हे त्याच्या आयुष्यासाठी अत्यंत निर्णायक ठरते. ही बाब लक्षात घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात आरोग्य सेवेचे अद्ययावत जाळे पसरवण्यात आले आहे. जिल्ह्यात १ मुख्य जिल्हा रुग्णालय (ओरोस) असून ते आपत्कालीन सोयी-सुविधांनी सज्ज आहे,

असा दावा आरोग्य विभागाकडून केला जात आहे. तालुका स्तरावर तातडीच्या उपचारासाठी शिरोडा, वेंगुर्ला, सावंतवाडी व कणकवली अशी ४ उपजिल्हा रुग्णालये २४ तास सेवा देत आहेत. याशिवाय प्रादेशिक समतोल साधत देवगड, वैभववाडी, मालवण, कुडाळ व दोडामार्ग अशा ६ प्रमुख ठिकाणी ग्रामीण रुग्णालये कार्यरत आहेत. तसेच तळागाळातील आणि अतिदुर्गम भागातील गावकऱ्यांसाठी जिल्ह्यात एकूण ३८ प्राथमिक आरोग्य केंद्रे (PHC) अखंडपणे सेवेत आहेत.

Snake Bite
Nilesh Rane : कुडाळ २१ व्या शतकातील शहर बनविण्याचा प्रयत्न!

पीएचसीत ५० इंजेक्शन्सचा राखीव साठा..!
आरोग्य प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सर्पदंशावरील तातडीच्या उपचारासाठी लागणाऱ्या प्रति-सर्पदंश लसीचा (Anti-Snake Venom - ASV) तुटवडा भासू दिला जात नाही. सद्यस्थितीत जिल्ह्यातील ३८ प्राथमिक आरोग्य केंद्रे, ६ ग्रामीण रुग्णालये, ४ उपजिल्हा रुग्णालये आणि १ जिल्हा रुग्णालय अशा सर्वच ठिकाणी प्रत्येक रुग्णालयात सर्पदंशाच्या ५० इंजेक्शन्सचा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे.

त्यामुळे कोणत्याही रुग्णाला औषधाअभावी दुसरीकडे हलवण्याची किंवा वेळेचा अपव्यय होण्याची पाळी येत नाही. याशिवाय, जिल्ह्यातील बहुतांशी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये बीएएमएस (BAMS) वैद्यकीय अधिकारी उपलब्ध आहेत. हे डॉक्टर सर्पदंशाच्या रुग्णावर तातडीने प्रथमोपचार करणे, सापाचे विष पसरण्यापासून रोखणे आणि गरज पडल्यास प्रति-सर्पदंश लसीचे डोस योग्य प्रमाणात देण्याचे काम कुशलतेने करत आहेत.

तीन प्रमुख मुद्दे

  • प्राथमिक केंद्रांमध्ये ५० इंजेक्शन्स उपलब्ध

  • सरकारी रुग्णालयात होतात बहुतांशी रुग्णांवर उपचार

  • तरीही लोकांनी सावध राहणे गरजेचे

तब्बल ९९.८७ टक्के रुग्ण थेट रुग्णालयात दाखल

जिल्ह्यात सर्पदंश झाल्यानंतर मांत्रिकाकडे किंवा अंधश्रद्धेला बळी न पडता थेट सरकारी रुग्णालयात दाखल होण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. आकडेवारीनुसार ३४६ रुग्णांपैकी ३४२ रुग्ण दाखल होऊन उपचार घेतलेले आहेत.आकडेवारी (चौकट १)

  • एकूण ३ हजार ३४६ रुग्ण (साडेतीन वर्षांत)

  • ३ हजार ३४२ पूर्णपणे सुखरूप बचावले

सर्व्हर स्नॅपशॉट

  • सरकारी रुग्णालयात आता सर्पदंशावर तत्काळ उपचार होतात

साप शत्रू नाही मित्रच आहे, मारू नका : राऊळ

साप हा आपला शत्रू नसून मित्र आहे. आपल्याकडे ७० टक्के औषधांच्या निर्मितीसाठी सापाचे विष आवश्यक असते. मात्र, अपूर्ण ज्ञान आणि अंधश्रद्धेमुळे सापांना मारले जाते, जे १९७२ च्या वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार शिक्षेस पात्र आहे.

आपल्या जिल्ह्यात सापांच्या २५ हून अधिक प्रजाती आढळतात, ज्यांपैकी केवळ नाग, घोणस, मण्यार आणि फुरसे हेच मुख्य विषारी साप आहेत. सप्टेंबर व ऑक्टोबर या महिन्यात सर्पदंशाचे प्रमाण अधिक होते, साप घरात आल्यास घाबरू नका किंवा त्याला मारू नका. लहान मुलांना सुरक्षित ठेवून तातडीने सर्पमित्रांना संपर्क साधा. सर्प मारणे थांबवून निसर्गाचा समतोल राखणे ही काळाची गरज आहे, असे वेंगुर्ला- तुळस येथील सर्पमित्र महेश राऊळ यांनी सांगितले.

वर्षनिहाय आकडेवारीचा सविस्तर पट (२०२३ ते २०२६)

शासकीय OPD आणि IPD रजिस्टरच्या आकडेवारीवरून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्पदंश उपचाराचे एक अतिशय पारदर्शक चित्र समोर येते. २०२३ वर्षामध्ये बाह्यरुग्ण विभागात (OPD) ९ रुग्ण आणि दाखल रुग्ण (IPD) १ हजार ४८ असे एकूण १ हजार ४९ रुग्ण नोंदवले गेले. आरोग्य यंत्रणेच्या तत्परतेमुळे या वर्षांत सर्पदंशामुळे एकही मृत्यू झाला नाही.

२०२४ वर्षामध्ये बाह्यरुग्ण विभागात ३ आणि दाखल रुग्ण १ हजार ६८ असे एकूण १ हजार ७१ रुग्ण उपचारासाठी आले. यातील १ हजार ६० रुग्ण सुखरूप वाचले, तर १ रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. २०२५ वर्षामध्ये बाह्यरुग्ण विभागात ५ आणि दाखल रुग्ण ९६७ असे एकूण ९७२ रुग्ण नोंदवले गेले. या वर्षांत दुर्दैवाने ३ रुग्णांचा मृत्यू झाला.

२०२६ वर्षाच्या सद्यस्थितीनुसार बाह्यरुग्ण विभागात २ आणि दाखल रुग्ण २५२ असे एकूण २५४ रुग्ण नोंदवले गेले असून, या वर्षांत आतापर्यंत एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
एकूण साडेतीन ते चार वर्षांच्या या कालावधीत जिल्ह्यात सर्पदंशाचे एकूण ३,३४६ रुग्ण आढळले, त्यापैकी ३,३४२ रुग्ण उपचारांनंतर पूर्णपणे बरे झाले आहेत. या कालावधीत एकूण मृत्यू संख्या केवळ ४ राहिली असून, जिल्ह्याचा एकूण सर्पदंश मृत्यूदर अवघा ०.१२ टक्के राहिला आहे.

Snake Bite
kudal City Development Plan | कुडाळ शहराचा ५० टक्‍के विकास आराखडा चुकीचा

दंश झाल्यावर काय करावे?

  • सर्पदंश झालेल्या रुग्णाला शांत ठेवून चावलेला अवयव स्थिर ठेवावा.

  • अंगठी, बांगडी किंवा घट्ट वस्तू काढाव्यात.

  • जखम कापणे, विष चोखणे किंवा घट्ट दोरी बांधणे टाळावे.

  • रुग्णाला तातडीने जवळच्या आरोग्य संस्थेत दाखल करावे.

  • घाबरू नका आणि धावपळ करू नका, यामुळे हृदयाचे ठोके वाढून शरीरात विष वेगाने पसरते.

  • जखमेवर चीरा मारू नका किंवा विष उपसण्याचा प्रयत्न अजिबात करू नका.

  • घट्ट बांधू नका. कारण दोरी किंवा कापड अतिशय घट्ट बांधल्याने रक्तपुरवठा बंद होऊन तो भाग कायमचा खराब होऊ शकतो.

  • बर्फ, मलम किंवा जडीबुटी लावू नका.

  • बाधित भागाची हालचाल करू नका. हात किंवा पाय जास्त हलवू नका, तो भाग स्थिर ठेवा.

  • झाडफूक आणि मांत्रिकाकडे जाऊ नका. वेळ वाया न घालवता थेट रुग्णालयात जा.

  • चहा, कॉफी, औषध किंवा दारू देऊ नका, रुग्णाला कोणतेही पेय किंवा अन्न देऊ नका.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news