Single Student School Issue | शाळेमधल्या एकाच मुलाचा मानसिक आणि भावनिक विकास होणार कसा?

Education Expert Opinion | शिक्षणतज्ज्ञांची परखड मते; एक मूल असलेल्या शाळा बंद व्हाव्यात
Single Student School Issue
शाळेमधल्या एकाच मुलाचा मानसिक आणि भावनिक विकास होणार कसा?(Pudhari File Photo)
Published on
Updated on

गणेश जेठे

दै. ‘पुढारी’ने ‘एक शाळा, एक शिक्षक, एक मूल’ या मथळ्याखाली एक मूल असलेल्या शाळांचे वास्तव मांडल्यानंतर अनेक शिक्षणप्रेमी आणि शिक्षणतज्ज्ञांनी आपली मते आणि विचार दै. ‘पुढारी’कडे मांडले. या शाळेत एक मूल शिकते आहे, अशा शाळेतील मुलांचा भावनिक आणि मानसिक विकास होणार कसा? असा प्रश्न अनेक शिक्षणप्रेमींनी उपस्थित केला आहे. ज्या शाळांमध्ये एकच मूल आहे, अशा मुलांना किमान 25 मुले असलेल्या अन्य शाळेत आणून त्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणावे लागेल. त्याबरोबरच एक मूल असलेल्या शाळा बंद कराव्या लागतील असा सल्लाही अनेकांनी दिला. खरेतर वेगवेगळ्या कारणांनी एकच मूल असलेल्या शाळा सुरू ठेवणे म्हणजे त्या मुलांवर अप्रत्यक्षरित्या अन्याय असल्याचे वास्तवही शिक्षणतज्ज्ञांनी मांडले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागात अशा एकच मूल शिकत असलेल्या जिल्हा परिषदेच्या तब्बल 36 शाळा आहेत. गेल्यावर्षी अशा 26 शाळा होत्या, यावर्षी त्यात 10 ने वाढ झाली आहे. एकही मूल नाही म्हणून काही शाळा बंद पडत आहेत. अर्थात, या 36 शाळाही सरकारने तातडीने बंद केल्या नाहीत तर पुढच्या सात-आठ वर्षांमध्ये त्या बंद पडणारच आहेत. कारण गावातून शहराकडे स्थलांतर वाढले आहे. लोक ग्रामीण भागातील आपले घर सोडून तालुक्याच्या ठिकाणी रहायला येत आहेत. छोटे-मोठे रोजगार करता करता आपल्या मुलांना शहरांमध्ये शिक्षण देत आहेत. त्यातही पुन्हा शहरांमध्ये अनेक खासगी शाळा आता उभ्या राहिल्या आहेत. या शाळा अनेक सुविधांनी युक्त असून, या शाळांचा परिसर स्वच्छ आणि सुशोभित आहे.

Single Student School Issue
Sindhudurg School News | ज्ञानमंदिरांमध्ये आजपासून विद्यार्थ्यांची किलबिल

मुलांच्या शिक्षणासाठी आई-वडील तालुक्याच्या ठिकाणी

या शाळांमध्ये असणार्‍या मुलांची संख्या शेकडोंच्या घरात असल्यामुळे मुलांचा मानसिक आणि भावनिक विकास वेगाने होतो आहे. अनेक उपक्रमांमध्ये आणि खेळांमध्ये भाग घेण्याची संधी या मोठ्या शाळेतील मुलांना मिळते आहे. विविध कला अवगत करून त्या विकसित करण्याची संधीही या तालुक्याच्या ठिकाणच्या शाळांमध्ये मिळते आहे. त्यामुळेच अशी अनेक कुटुंबे गावातील आहेत की आपली मुले चांगल्या शाळेत शिकावी म्हणून तालुक्याच्या ठिकाणी रहायला येत आहेत. विशेष म्हणजे या शाळा चालविणार्‍या संस्था स्कूलबस घेवून गावोगावी जातात आणि तेथील मुले घेवून तालुक्याच्या ठिकाणी आणून शिकवतात. गावात रहाणारी काही कुटुंबे आपली मुले या स्कूलबसमधुन तालुक्याच्या ठिकाणी शिकविण्यासाठी पाठवितात. गावातच कुणी थांबायला तयार नाही तर मुलांच्या शिक्षणासाठी गावात कोण थांबणार, असा प्रश्न निर्माण करणारी परिस्थिती सध्या निर्माण होत आहे. शेती आणि शेतीपूरक उद्योग हे उत्पन्नाचे गावात मोठे साधन असले तरी शेतात जावून चिखलात हातपाय घालण्याची कुणाची तयारी नाही. अशा परिस्थितीमुळेच गावातल्या मुलांची संख्या कमी होते आहे. त्यातही एक कुटुंब आणि एकच मूल हे धोरण अवलंबले जात आहे. त्यामुळे कुटुंबातील एकाच मुलाला चांगले शिक्षण मिळावे या हेतुने तालुक्याच्या शाळांमध्ये मुलांना प्रवेश देण्याचे प्रमाण वाढले आहे.

गावातील पटसंख्या वाढण्याची शक्यता कमी

अशी सर्व परिस्थिती असताना ज्या शाळांमध्ये एक मूल आहे अशा शाळा पहिल्या टप्प्यात बंदच करायला हव्यात, असे ठाम मत शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. काही शाळांमध्ये दोन मुले आहेत, काही शाळांमध्ये तीन ते पाच मुले आहेत. ज्या शाळांमध्ये सध्या एक मूल आहे त्या शाळांमध्ये तीन चार वर्षांपूर्वी चार ते पाच मुले होती. काही शाळांमध्ये तर त्या पेक्षाही जास्त मुले होती. परंतु आता इतक्या वेगाने पटसंख्येमध्ये घट होवून एकच मूल उरले आहे. याचाच अर्थ त्या शाळांमध्ये सध्या चार ते पाच पटसंख्या आहे, ती त्या शाळांमधील पटसंख्या पुढच्या काही वर्षात एकवर येणार आहे. हे जर खरे आहे तर अशा शाळा आताच बंद कराव्यात आणि या मुलांना ज्या ठिकाणी अधिकची मुले आहेत अशा शाळांमध्ये पाठवावे. यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घ्यावा, या मुलांच्या प्रवासाचा खर्च करावा. नाहीतरी एका शिक्षकाचा वर्षाचा पगार 10 लाख रू.च्या आसपास जातो. त्या तुलनेत प्रवास खर्च खुपच कमी येईल आणि त्या मुलांना हक्काचं, चांगल्या वातावरणातलं स्पर्धात्मक शिक्षण मिळेल.

एक मूल असलेल्या शाळा सुरू राहण्यामागे अनेक कारणे

एक मूल असतानाही या शाळा सुरू राहण्यामागे अनेक कारणे आहेत. त्यातील महत्वाचे कारण म्हणजे या शाळांप्रती असलेल्या ग्रामस्थांच्या भावना. 50 ते 100 वर्षांपेक्षा अधिक काळ सुरू असलेल्या या शाळा बंद करण्याची मानसिकता ग्रामस्थांची नाही. त्याशिवाय एक शाळा म्हटली की शिक्षक, शालेय पोषण आहार शिजवणारी महिला हे घटकही महत्वाचे आहेत. त्याशिवाय अनेक शाळांना जोडून अंगणवाडी आहे.

शाळाच बंद पडली तर अंगणवाडीचे काय? असाही प्रश्न उभा राहतो. त्याचवेळी अंगणवाड्यांमधील मुलांची संख्या कमी होते आहे. अनेक पालक अंगणवाडी पर्यंत आपल्या मुलांना गावात ठेवतात. त्यानंतर पहिलीपासुन तालुक्याच्या ठिकाणच्या शाळेमध्ये पाठवतात. त्यामुळे काही ठिकाणी जिल्हा परिषदेत शाळे जरी मुले कमी असली तरी तुलनेने अंगणवाडीमध्ये जास्त आहेत असेही चित्र आहे. या अंगणवाड्या टिकविण्यासाठी देखील शाळा बंद पडू नयेत असा विचार काही ठिकाणी ग्रामस्थ करतात. तरीही अंगणवाड्या पुढील काही वर्षे चालू शकतील, मात्र शाळा चालण्याची शक्यता कमीच आहे असे तज्ज्ञांचे मत आहे. त्या पुढे जावून ज्या मुलासाठी शिक्षण दिले जाते त्या मुलाच्या शिक्षणाचा विचार होणे इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा महत्वाचे आहे.

Single Student School Issue
Educational Progress Planning | शैक्षणिक भरारी घ्यायची तर...

खेळांपासून वंचित

ज्या शाळेत एक मूल आहे त्या शाळेमध्ये शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करता येत नाही. कारण ती पालकांमधून स्थापन करावी लागते. ज्या शाळेत एकच मूल आहे त्या शाळेत व्यवस्थापन कसे करावे हा पण एक प्रश्न उभा राहतो. त्या मुलाला खेळ कुठले शिकवावेत. कबड्डी, खो-खो असे शाळेतल्या खेळांमध्ये शाळेतले एकच मूल वंचित राहते हा अप्रत्यक्षरित्या त्या मुलावर होणारा अन्यायच म्हणावा लागेल.

मुलाचा आत्मविश्वास कसा वाढेल? : काका कुडाळकर

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून कुडाळ येथील हेमंत उर्फ काका कुडाळकर यांनी प्रभावी काम केले. ते स्वत: उच्चशिक्षित असून त्यांनी या परिस्थितीवर दैनिक पुढारीकडे विस्तृत मत नोंदवले आहे. ते म्हणतात की, ज्या शाळेमध्ये एकच मूल आहे त्या मुलाचा भावनिक आणि मानसिक विकास होणारच नाही. त्याबरोबरच समाजामध्ये वावरण्याचं एक शिक्षण शाळेत मिळत असतं ते या मुलांना मिळणार नाही. शाळेत एकच मूल असेल तर त्या मुलाला जगण्यातला आत्मविश्वास कसा येणार असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. मूल म्हटले की त्याला खेळण्यासाठी, बुध्यांक वाढीसाठी आणि त्याच्या व्यक्तिमत्व विकासासाठी शाळेतल्या मित्रांची गरज असते. एक मूल असलेल्या शाळेत ही मैत्री मिळणार कशी? मुलांना दोन ठिकाणी शिक्षण मिळत असते... एक घरात आणि दुसरे शाळेत. मुळात घरांमध्ये माणसांची संख्या कमी झाली आहे. अशा स्थितीत शाळेतलं वातावरण पोषक असणे आवश्यक आहे. त्यासाठी शाळेत मोठ्या संख्येने मुले असायला हवीत. ज्या शाळेत मुले नाहीत त्याला शाळा कसे म्हणावे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. ज्या शाळेत दोन-चार मुले आहेत अशा ठिकाणी भले परीक्षेचा निकाल चांगला लागेल, परंतु मुलांची निरीक्षण शक्ती कमी असेल आणि आत्मविश्वासही घटलेला असेल. म्हणून या शाळा बंद करून या मुलांना जिथे जास्त मुले आहेत अशा शाळेमध्ये पाठविण्याची नितांत गरज आहे, असे मत काका कुडाळकर यांनी व्यक्त केले.

Single Student School Issue
AI Impact on Education | पारंपरिक शिक्षण पद्धत कालबाह्य होईल?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news