

नांदगाव : कासार्डे-गडमठ मार्गे फोंडाघाट मार्गावर कासार्डे-दाबवाडी दरम्यान रस्त्यावर मोठ मोठ्या खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे वाहनचालक व पादचार्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सध्या मुसळधार पावसामुळे खड्ड्यात पाणी साचून अपघाताची शक्यता असल्याने येथील युवकांनी एकत्र येत या खड्ड्यात वृक्ष लागवड केली.
कासार्डे-गडमठमार्गे फोंडाघाट मार्ग कासार्डे दक्षिण गावठण, आंबा स्टॉप ते कासार्डे-दाबवाडी भागात खड्ड्यांसाठी गेली अनेक वर्षे प्रसिध्द आहे. गेली काही वर्षे सार्व. बांधकाम विभाग या मार्गाची डागडुजी करते. मात्र ती डागडुजी तकलादू असल्याने नेहमीच या मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य दिसून येते. वेळोवेळी याबद्दल निवेदन देवूनही या मार्गाची अवस्था कायम आहे. दरम्यान अवजड वाहतूक व संबंधित विभागाचे दुर्लक्ष यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे असे स्थानिकांकडून सांगण्यात येते. या मार्गावर प्राथमिक आरोग्य केंद्र,ग्रामपंचायत, सोसायटी, अनेक वाडया आहेत. तरी त्यांना यातूनच प्रवास करावा लागत आहे.
या मार्गाच्या कामाबाबत अधिकारी गंभीर नसून पदाधिकार्यांनीही विषय लावून न धरल्याने आजची परिस्थिती उद्भवली आहे. येत्या काही दिवसांत सदर खड्डे डांबरीकराणाने किंवा सिमेंट काँक्रीटने बुजविण्यात यावेत अशी मागणी युवकांसह वाहनचालक व नागरिक करीत असून अन्यथा रास्तारोका करण्याचा इशारा दिला आहे.