

कासार्डे : कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून कोकणचे सुपुत्र सुनील नारकर यांनी पदभार स्वीकारला आहे. या नियुक्ती बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होेत आहे.
श्री. नारकर हे सन 1997 मध्ये कोकण रेल्वेमध्ये रत्नागिरीत क्षेत्रीय ट्रॅफिक व्यवस्थापक पदावर रुजू झालेे. त्यानंतर त्यांनी मडगाव येथे वरिष्ठ क्षेत्रीय वाहतूक व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. पुढे बेलापूर येथे कोकण रेल्वे मुख्यालयामध्ये मुख्य वाणिज्य प्रबंधक म्हणून त्यांनी यशस्वी कामगिरी बजावली. आता पदोन्नतीने त्यांची कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.
सुनील नारकर हे कणकवली तालुक्यातील पियाळी गावचे सुपुत्र आहेत. त्यांचे पाचवी पासून बारावी पर्यंतचे शिक्षण कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक विद्यालयामध्ये झाले. कासार्डे विद्यालयाच्या सन 1990-92 च्या दहावी-बारावीच्या बॅचमधील ‘याराना मित्र’ परिवाराचे ते सक्रिय सदस्य आहेत. त्यांना सामाजिक कार्याची देखील विशेष आवड आहे.
आपल्या वाढदिवसा दिवशी कॅन्सर पिडीत लहान मुलांना ते कोकण रेल्वेतून मुंबई ते गोवा अशी सफर करून आणतात. कोकणातील या सुपुत्राची कोकण रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी या महत्त्वाच्या पदांवरती नियुक्ती झाल्याबद्दल त्यांच्या जन्मगावी पियाळी तसेच कासार्डे परिसरातून अभिनंदन वर्षाव होत आहे.