

आचरा : पटसंख्येच्या निकषांवर शिक्षक कपात करणे अन्यायकारक असून शासनाने सदर निर्णयाचा तातडीने फेरविचार करावा, अशी मागणी करत वायंगणी ग्रामस्थांनी शासनाच्या शिक्षक कपात धोरणा विरोधात वायंगणी ग्रामपंचायत ते ज्ञानदीप विद्यालय या मार्गावर जनजागृती रॅली काढत संताप व्यक्त केला. या रॅलीचे पुढे सभेत रूपांतर झाले. सभेत शासनाच्या निर्णयावर रोष व्यक्त करण्यात आला. सभेचे अध्यक्षपद वायंगणी सरपंच रुपेश पाटकर यांनी भूषविले.
सरपंच रुपेश पाटकर, ज्ञानदीप संस्था अध्यक्ष हनुमंत प्रभू, संस्था खजिनदार समृद्धी आसोलकर, ग्रा. पं. सदस्य श्रीकृष्ण वायंगणकर, सचिन रेडकर, रसिका सावंत, शामसुंदर नाईक, संजना रेडकर तसेच सामाजिक कार्यकर्ते सुधाकर वायंगणकर व उदय दुखंडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हडकर, संस्था सचिव वैभव जोशी,रावजी सावंत यांनी शिक्षक कपात धोरणावर कडाडून टीका केली. कोकणातील भौगोलिक परिस्थिती, वस्तीची विरळता व ग्रामीण वास्तव लक्षात घेता केवळ पटसंख्येच्या निकषांवर शिक्षक कपात करणे अन्यायकारक असून या निकषांचा या भागाला थेट अंमल लागू होत नसल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. शासनाने सदर निर्णयाचा तातडीने फेरविचार करावा, अशी एकमुखी मागणी सभेत मांडण्यात आली.
सभेत ज्ञानदीप माध्यमिक विद्यालयात पुढील शैक्षणिक वर्षापासून सेमी-इंग्लिश अभ्यासक्रम सुरू करण्याची मागणी एकमताने मान्य करण्यात आली. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून शासन दरबारी मान्यता मिळावी, असा ठराव सभेदरम्यान पारित करण्यात आला. या आंदोलनाचे आयोजन ग्रामपंचायत वायंगणी, ज्ञानदीप शैक्षणिक समन्वय समिती व ज्ञानदीप संस्था, यांच्या विद्यमाने करण्यात आले होते.