

ओरोस ः जिल्ह्यातील एकही शाळा बंद होणार नाही यासाठी झटून प्रयत्न करू, असे आश्वासन सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मोर्चेकऱ्यांना दिले. या मोर्चात माजी आमदार वैभव नाईक आणि माजी जि.प.अध्यक्ष सतीश सावंत हेही सहभागी झाले होते. विशेष म्हणजे मोठ्या प्रमाणात शाळकरी मुले मोर्चात अग्रभागी घोषणा देत होती. पोलिसही मोठ्या संख्येने बंदोबस्ताला होते. मोर्चेकऱ्यांनी विविध घोषणा देत सिंधुदुर्गनगरी दणाणून सोडली.
सिंधुदुर्गनगरी येथे ‘शाळा वाचवा शिक्षण वाचवा’ मंच सिंधुदुर्गच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला 97 वर्षीय ज्येष्ठ महिला सुमती विष्णू परब यांच्या हस्ते पुष्पहार घालून भव्यदिव्य अशा मोर्चाला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आलेला मोर्चा विविध जिल्हाभरातील शाळा, संस्था प्रतिनिधी, शिक्षक प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, विद्यार्थी, पालक हजारोच्या संख्येने उपस्थित होते. अनेक शाळांमधील मुले, मुली शालेय गणवेशामध्ये सहभागी झाले होते. त्यांच्या हातात घोषवाक्ये लिहिलेले फलक हेो आणि ते जोरदार घोषणा देत हेोते. शाळा वाचवा अशी आर्त हाक ते शासनाला देत होते. यावेळी अनेक लोकप्रतिनिधी, गावोगावचे सरपंच सुद्धा या मोर्चात सहभागी झाले होते. देवगड तालुक्यातील किंजवडेचे सरपंच संतोष किंजवडेकर हेसुद्धा या शाळा वाचवण्यासाठी या मोर्चात पुढाकार घेऊन सहभागी झाले होते. आरे गावातील ग्रामस्थदेखील मोठ्या संख्येने आपले हायस्कूल वाचवण्यासाठी मोर्चात उपस्थित होते.
या मोर्चाची रांग इतकी मोठी होती की त्याची सुरुवात जिल्हा परिषद भवनाच्या समोर होती आणि शेवट एसटी बस स्थानकापर्यंत होता. मोर्चात अतिशय उत्साहाने लोक सहभागी झाले हेोते आणि ते शाळा वाचविण्याचे आवाहन सरकारला करत हेोते. हा मोर्चा सुरू असतानाच डॉन बॉस्को येथे आला असता या मोर्चात माजी आमदार वैभव नाईक, माजी जि. प. अध्यक्ष सतीश सावंत सहभागी झाले. शाळा वाचवा शिक्षण वाचवा मंच सिंधुदुर्गचे अध्यक्ष संजय वेतुरेकर, सचिव महेश पाटोळे, संतोष राणे यांच्यासह अनेक शिक्षण संस्था प्रतिनिधी, शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शाळा वाचवा शिक्षण वाचवा, गावाच्या भवितव्यासाठी मुलांच्या, मुलींच्या भवितव्यासाठी ग्रामीण भागातील शाळा महत्त्वाच्या अशा विविध घोषणा देत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकला. जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद या मोर्चाला मिळाला होता.
सिंधुदुर्ग आणि कोकणाला स्वतंत्र निकष लावण्यास भाग पाडू ः नितेश राणे
या मोर्चाला सामोरे जात जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मोर्चेकऱ्यांना आश्वस्त केले. राज्याचे मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांच्यासमवेत आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे व आपण प्रत्यक्ष भेट घेऊन आपल्या कमिटीच्या माध्यमातून या निर्णयाबाबत सकारात्मक बैठक घेऊ. सिंधुदुर्गसह कोकणात राज्याच्या दृष्टीने लावण्यात येणारे निर्णय कोकणाला बंधनकारक करू नये हा कोकणासाठी अन्याय होत असल्याचे आपण यापूर्वीपासून विषय मांडले आहेत. कोकणासाठी डोंगराळ जिल्हा सिंधुदुर्ग असल्याने वेगळा निकष कसा लावता येईल यादृष्टीने उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीतही चर्चा घडवून आणू आणि येत्या काही दिवसात यावर सकारात्मक निर्णय घेऊ. जिल्ह्यातील एकही शाळा बंद होणार नाही. साक्षर सिंधुदुर्ग जिल्ह्यात येथील विद्यार्थी, मुली शिक्षणापासून वंचित होणार नाही याची आम्ही दखल घेऊ अशी ग्वाही पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली
डिगस येथील विद्यार्थिनी स्नेहा लाड हिने सावित्रीबाई फुले यांनी मुलींना शिक्षण देण्यासाठी पुढे आणले आणि सध्याचे शासन मुलींना शिक्षणापासून अंधकारमय वातावरणाची वाट दाखवत आहे. वीस पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा घाट घातला असून भविष्यात या शाळा बंद झाल्यास मुलींना शिक्षणापासून वंचित राहावे लागणार आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांना अन्यायकारक या निर्णयामुळे भविष्यातील पिढी शिक्षणापासून वंचित होणार आहे. शिक्षण वाचले तर समाज घडेल यादृष्टीने शासनाने योग्य तो निर्णय घेतला पाहिजे .
पौर्णिमा घाडी या विद्यार्थिनीने शालेय शिक्षण म्हणून आम्ही मुली दूरवरच्या शाळेमध्ये जाणे मुलींना शक्य नाही. लोकांनी स्थलांतर केल्यामुळे आणि ग्रामीण भागातील पटसंख्या कमी आहे या कारणामुळे शाळा बंद करण्याचा निर्णय हा विद्यार्थ्यांना मुलींना शिक्षणापासून वंचित करणारा असा आहे. भविष्यात आमच्या ग्रामीण भागातील शाळा वाचल्या पाहिजेत हा आमचा या मोर्चाच्या माध्यमातून प्रयत्न आहे असे सांगितले.
हे आंदोलन अधिक तीव्र होईल ः वैभव नाईक
माजी आ. वैभव नाईक यांनी प्राथमिक आणि माध्यमिक शाळा भविष्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दृष्टीने महत्त्वाच्या असून राज्य शासनाने महाराष्ट्रात विद्यार्थ्यांना योग्य तो धोरणात्मक निर्णय घेतला पाहिजे. आज उत्तम दर्जाचे शिक्षण आणि चांगला निकाल देणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात या शासनाच्या 15 मार्च 24 च्या निर्णयामुळे पुढील पिढी शिक्षणापासून वंचित होणार आहे. आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातून या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. भविष्यात राज्यातील जिल्ह्या-जिल्ह्यात हे आंदोलन अधिकाधिक तीव्र होत जाईल. त्याचबरोबर ग्रामीण भागातील शाळा बंद झाल्यामुळे सांस्कृतिक सरस्वती पूजन सारखे कार्यक्रम बंद होतील याची भीती विद्यार्थी आणि पालकांमध्ये निर्माण झाली आहे. आमचा या मोर्चाला पाठिंबा असून यापुढेही न्याय प्रश्नासाठी आम्ही सदैव सहकार्य करू असेही ते म्हणाले.
ग्रामीण भागातील मराठी शाळा बंद करण्याचा प्रयत्न ः सतीश सावंत
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश सावंत म्हणाले, मराठी शाळा बंद करण्याचा हा घाट शासनाने घातला असून इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करून ग्रामीण भागातील मराठी शाळा बंद करण्याचा हा प्रयत्न आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा पूर्ण क्षमतेने चालल्या पाहिजे तरच गोरगरीब मुलांना शिक्षण मिळू शकेल. शाळांना योग्य शिक्षक दिले पाहिजेत. प्रत्येक विषयवारीप्रमाणे शिक्षक आवश्यक आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुर्गम शाळा शहरात किंवा अन्य ठिकाणी सुरू झाल्यास अनेक ग्रामीण गरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित होऊ शकतात. राजकीय मतभेद बाजूला ठेवून एक संस्था प्रतिनिधी म्हणून आम्ही या मोर्चाला पाठिंबा देत असल्याते सांगत शासनाने 15 मार्च 24 चा शासन निर्णय रद्द करून कोकणासाठी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी योग्य निर्णय घ्यावा असेही त्यांनी सांगितले.
...अन्यथा 26 पासून उपोषण
शालेय शिक्षण विभागाने 15 मार्च 2024 चा शासन निर्णय रद्द करावा. कमीपट संख्येच्या नावाखाली शाळा बंद व विद्यार्थ्यांचे समायोजन करण्याचे धोरण रद्द करून बालकांच्या शिक्षणाची हेळसाड थांबवावी. शाळा बंद करून क्लस्टर पद्धत राबविण्याऐवजी गावातील शाळा तिथेच कशा टिकतील, यासाठी शासनाने धोरण राबवावे. हा निर्णय न बदलल्यास येत्या (दि. 26) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आंदोलन करावे लागेल, असा इशाराच यावेळी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.