

कुडाळ : काशिराम गायकवाड
दीपावलीच्या सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटकांचा मोठा ओघ सुरू असून, गेल्या तीन-चार दिवसांपासून संपूर्ण जिल्हा पर्यटकांच्या गर्दीने गजबजून गेला आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगलीसह गोवा, बेळगाव, सुरत आदी विविध भागांतून हजारोंच्या संख्येने पर्यटक सिंधुदुर्गात दाखल झाले आहेत. समुद्रकिनारे, ऐतिहासिक किल्ले, निसर्गरम्य पर्यटनस्थळे आणि धार्मिक स्थळांवर पर्यटकांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. पर्यटकांच्या वाढत्या गर्दीमुळे जिल्ह्यातील किनारपट्टी भागातील हॉटेल, लॉज, रिसॉर्ट आणि होम स्टे जवळपास हाऊसफुल्ल झाले असून पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळाली आहे.
दीपावलीनिमित्त शाळा, महाविद्यालयांना सुट्ट्या असल्याने अनेक कुटुंबांनी कोकण पर्यटनाला पसंती दिली आहे. पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यातील पर्यटकांचा कोकणाकडे विशेष ओढा असतो. यंदाही सुट्ट्यांचे नियोजन करून पर्यटकांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला पसंती दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळांवर सकाळपासून संध्याकाळपर्यंत पर्यटकांची वर्दळ मालवण तालुक्यातील ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला, राजकोट किल्ला, रॉक गार्डन, तारकर्ली, देवबाग, चिवला बीच, आचरा समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची विशेष गर्दी होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक वारशाची माहिती घेण्यासोबतच समुद्रसौंदर्याचा आनंद पर्यटक घेत आहेत. तारकर्ली आणि देवबाग येथील निळाशार समुद्र, स्वच्छ वाळूचे किनारे पर्यटकांना आकर्षित करत आहेत.
वेंगुर्ले तालुक्यातील बंदर जेटी, झुलता पूल, नवाबाग, सागरेश्वर, शिरोडा वेळागर, रेडी, खवणे, भोगवे आणि निवती या समुद्रकिनाऱ्यांवरही पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. विशेषतः खवणे येथील कायाक जलसफारी पर्यटकांचे आकर्षण ठरत असून, या साहसी जलक्रीडेचा अनुभव घेण्यासाठी पर्यटकांची मोठी पसंती मिळत आहे. देवगड आणि कुणकेश्वर परिसरातील समुद्रकिनारे तसेच धार्मिक स्थळांवरही भाविक आणि पर्यटकांची वर्दळ वाढली आहे.
निसर्गसौंदर्यासह कोकणी खाद्यसंस्कृतीचीही भुरळ !
कोकणात आलेले पर्यटक येथील स्वच्छ आणि निसर्गरम्य समुद्रकिनारे, नारळी-पोफळीच्या बागा, हिरवळ, मंदिरे आणि शांत वातावरणाचा मनमुराद आनंद घेत आहेत. पर्यटनासोबतच अस्सल कोकणी खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेण्याकडेही पर्यटकांचा कल आहे. ताजे मासे, मासळीचे विविध पदार्थ, मटण-चिकनची कोकणी पद्धतीने बनवलेली रुचकर पाककृती तसेच स्थानिक खाद्यपदार्थांना पर्यटकांकडून विशेष पसंती मिळत आहे. त्यामुळे किनारपट्टी भागातील हॉटेल आणि खानावळींमध्येही मोठी गर्दी होत आहे. पर्यटन व्यवसायाला सुगीचे दिवस; स्थानिक बाजारपेठेत उलाढाल वाढली!
पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे किनारपट्टी भागातील हॉटेल, लॉज, रिसॉर्ट आणि होम-स्टे व्यावसायिकांना सुगीचे दिवस आले आहेत. अनेक पर्यटनस्थळांवरील निवासव्यवस्थांचे पुढील तीन-चार दिवसांचे बुकिंग पूर्ण झाले आहे. पर्यटकांकडून खाद्यपदार्थ, ताजी मासळी, कोकणी मेवा आणि स्थानिक वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे. परिणामी स्थानिक बाजारपेठेसह मच्छीमार बांधव, व्यावसायिक, छोटे विक्रेते आणि पर्यटनाशी संबंधित विविध घटकांच्या व्यवसायातही चांगली उलाढाल होत आहे.
दीपावलीच्या सुट्ट्यांमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटनाचे नवे चैतन्य लाभले असून, पुढील काही दिवसही पर्यटकांची अशीच गर्दी कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. निसर्गसौंदर्य, ऐतिहासिक वारसा, स्वच्छ समुद्रकिनारे आणि अस्सल कोकणी पाहुणचार यामुळे दीपावलीच्या पर्यटनासाठी सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटकांच्या पसंतीचे ठिकाण ठरत आहे.