

Oros Goa Made Liquor Smuggling
कुडाळ : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ओरोस येथील जिजामाता चौकात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने शुक्रवारी ( दि. ४) पहाटे धडक कारवाई करत गोव्याहून मुंबईकडे बेकायदेशीररीत्या नेली जाणारी तब्बल १ कोटी १५ लाख २० हजार रुपयांची गोवा बनावटीची विदेशी दारू जप्त केली.
या कारवाईत ३५ लाख रुपये किंमतीचा टाटा सिग्मा १० टायरी ट्रक आणि एक मोबाईलसह एकूण १ कोटी ५० लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राजस्थानमधील एका दारूतस्कराला अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी विरेंद्र गोविंद पटेल (वय ४९, रा. लोलावत का मोहल्ला, धर्कदा, उदयपूर संगतडा, राजस्थान) याच्याविरुद्ध सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह मुंबई-गोवा महामार्गावरील अवैध दारू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
गुप्त माहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पहाटे सुमारे १.४५ वाजता ओरोस येथील जिजामाता चौकात सापळा रचून संशयित टाटा सिग्मा ट्रक अडवला. ट्रकची झडती घेतली असता त्यामध्ये चोरट्या मार्गाने वाहतूक केली जात असलेला गोवा बनावटीच्या विदेशी दारूचा मोठा साठा आढळून आला. पोलिसांनी तात्काळ ट्रकसह संपूर्ण मुद्देमाल जप्त करून चालकाला ताब्यात घेतले.
या कारवाईत १ कोटी १५ लाख २० हजार रुपयांची विदेशी दारू, ३५ लाख रुपयांचा टाटा सिग्मा १० टायरी ट्रक आणि १० हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण १ कोटी ५० लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सिंधुदुर्गनगरी पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक कु. नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले, अनिल हाडळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, पोलीस हेड कॉन्स्टेबल बस्त्याव डिसोझा, आशिष जामदार, विल्सन डिसोजा तसेच पोलीस कॉन्स्टेबल माहेश्वर समजिस्कर आणि ऋषिकेश टोपले यांनी सहभाग घेतला.