

कुडाळ : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून मद्यपान करून बेदरकारपणे व धोकादायक पद्धतीने मल्टी एक्सेल ट्रक (ट्रेलर) चालविणाऱ्या दोन ट्रक चालकांवर महामार्ग पोलिसांनी धडक कारवाई केली. दोन्ही चालकांवर ‘ड्रंक अँड ड्राईव्ह'चा गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करण्यात आल्याची माहिती महामार्ग पोलिसांकडून देण्यात आली. शनिवारी सायं.६.३० वा.च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
शनिवारी सायंकाळी हे दोन्ही ट्रेलर भरधाव वेगाने आणि अत्यंत धोकादायक पद्धतीने गोवा ते मुंबई जात होते. दोन्ही ट्रेलर चालक महामार्गावरील वाहनांना हुलकावणी देत बेदरकारपणे ओव्हरटेक करत असल्याने महामार्गावर भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, एका सतर्क नागरिकाच्या प्रसंगावधानामुळे आणि महामार्ग पोलिसांच्या तातडीच्या कारवाईमुळे संभाव्य मोठा अपघात टळला.
पावशीतील मेहनील वाटवे हे महामार्गावरून प्रवास करत असताना त्यांनी दोन ट्रेलर भरधाव वेगाने आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करत धावत असल्याचे पाहिले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी तत्काळ महामार्ग पोलिस रूपेश सारंग यांच्यामार्फत कसाल येथे महामार्ग पोलिस केंद्राशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून माहिती दिली. या नुसार महामार्ग पोलिस यंत्रणा तात्काळ सतर्क झाली. ओसरगाव टोल नाका येथे कर्तव्यावर असलेले सहा.पोलिस उपनिरीक्षक अनंत हडकर, पोलिस नाईक अमोल महाडिक, कैलास ढोले तसेच पोलिस शिपाई सूरज ठाकूर, महादेव साबळे आणि कुंडलिक वानोळे यांनी दोन्ही ट्रेलर थांबवून त्यांची तपासणी केली. या तपासणीदरम्यान दोन्ही ट्रेलर चालकांनी मद्यप्राशन केल्याचे आढळून आले. यानंतर महामार्ग पोलिस अधिकारी दीपाली जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही चालकांविरुद्ध 'ड्रंक अँड ड्राईव्ह' अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. दोन्ही ट्रेलर गोवा ते सांगली जात होते.