

सावंतवाडी : आजगावसह परिसरातील 'त्या' ११ ही गावांमध्ये कोणत्याही प्रकारचा मायनिंग (खाणकाम) प्रकल्प होऊ देणार नाही, असा स्पष्ट शब्द पालकमंत्री नितेश राणे यांनी आजगाव दशक्रोशीवासीयांना दिला आहे. आजगाव येथे होऊ घातलेल्या मायनिंग प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर ड्रोन सर्वेक्षण झाल्यानंतर गावात मोठे वादंग निर्माण झाले होते. या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवण्यासाठी ग्रामस्थांनी येत्या २३ तारखेला एका भव्य रॅलीचे आयोजन करण्याचा इशाराही दिला होता. या पार्श्वभूमीवर, पालकमंत्री नितेश राणे यांनी आज येथील वेतोबा मंदिरात ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली आणि त्यांची बाजू ऐकून घेतली.
ग्रामस्थांशी संवाद साधताना नितेश राणे म्हणाले, "मी पालकमंत्री पदावर असेपर्यंत आजगावच काय, तर परिसरातील ११ ही गावांमध्ये मायनिंग प्रकल्प होऊ देणार नाही. या प्रकल्पाला गावाचा तीव्र विरोध आहे, ही वस्तुस्थिती मला समजली आहे. त्यामुळे मी शब्द देतो की, या ठिकाणी कोणताही मायनिंग प्रकल्प होणार नाही." पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, या भागात प्रदूषणकारी प्रकल्पांऐवजी पर्यावरणपूरक योगा सेंटर, पंचतारांकित हॉटेल्स यांसारखे पर्यटन प्रकल्प आणण्याचा आमचा मानस आहे. आ. दीपक केसरकर हे देखील यासाठी विशेष प्रयत्नशील असून, येणाऱ्या काळात मुंबई, पुणे, गोवा आदी ठिकाणी कामासाठी गेलेले स्थानिक युवक पुन्हा आपल्या जिल्ह्यात परत यावेत, यासाठी आमचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.
या दरम्यान, मायनिंग प्रकल्पाच्या वादामुळे निर्माण झालेल्या राजकीय आणि सामाजिक गैरसमजांवरही त्यांनी जाहीर पडदा टाकला. ड्रोन सर्वेक्षण हे संबंधित कंपनीच्या माध्यमातून आणि शासनाची रीतसर परवानगी घेऊनच करण्यात आले होते, असे सांगत राणे म्हणाले, "या मायनिंग प्रकल्पाच्या मागे जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांचा कोणताही संबंध नाही. ते माझ्या घरचे सदस्य आहेत, त्यामुळे त्यांच्याबद्दल कोणीही गैरसमज करून घेऊ नये." आपण स्वतः शब्द दिल्यानंतर आता हा प्रकल्प होणार नसल्याने येथील लोकांनी आपले प्रस्तावित आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
या महत्त्वपूर्ण बैठकीला जि. प. अध्यक्ष प्रमोद कामत, आरोग्य सभापती रितेश राऊळ, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब, ग्रामस्थ तथा अॅड. स्वप्निल प्रभू आजगावकर, सरपंच यशस्वी सौदागर, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, अजित नातू स्वप्निल परब हेमंत मराठे यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
"माझ्या वाढदिवसाच्या दिवशी आंदोलन करू नका," अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांच्याकडे पाहत करताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.