Cricket Humanity Gesture | क्रिकेट सामन्यात जिंकली माणुसकी !

आडवलीच्या मैदानात घडला आदर्श : किंजवडे येथील आजारी क्रिकेटपटूला बक्षीस मदत
Cricket Humanity Gesture
Cricket Humanity Gesture pudhari photo
Published on
Updated on

कणकवली : नितीन सावंत

क्रिकेटच्या अंतिम सामन्यात काहीही करून प्रथम क्रमांकाचे बक्षीस जिंकायचे या निर्धाराने ते मैदानात उतरले होते. कारण त्यांना अधिकाधिक आर्थिक मदत आपल्या गावातील एका आजारी क्रिकेटपटूला करायची होती. अटीतटीच्या सामन्यात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले; मात्र त्यांच्या या उपक्रमाची माहिती विजेत्या संघाला मिळाल्यानंतर त्या संघाने चक्क आपल्या प्रथम विजेत्या पदाची बक्षिसाची रक्कम उपविजेत्या संघाला सुपूर्त केली. यातून माणुसकीचे दर्शन घडले नव्हे तर या स्पर्धेतील अंतिम सामन्यात माणुसकी जिंकली होती. हा आदर्श मालवण तालुक्यातील आडवली गावच्या मैदानावर घडला.

देवगड तालुक्यातील किंजवडे घाडीवाडीतील श्री नवदुर्गा क्रिकेट संघ आजवर अनेक क्रिकेट स्पर्धांमध्ये सहभागी झाला आहे. मालवण तालुक्यातील आडवली गावात स्वामी गांगेश्वर चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे समजल्यावर या स्पर्धेत श्री नवदुर्गा स्पोर्ट्स किंजवडे घाडी वाडी हा संघ सहभागी झाला. या स्पर्धेत सहभागी होताना या संघाने स्पर्धेत अंतिम विजेतेपद मिळवायचे आणि त्या बक्षिसाची रक्कम किंजवडे घाडीवाडीतील माजी ग्रामीण क्रिकेटपटू सत्यविजय श्रीधर घाडी यांना आजारपणावरील उपचारासाठी मदत म्हणून द्यायची असे ठरविले होते.

कारण आजारपणातील उपचारासाठी त्या क्रिकेटपटू व कुटुंबीयांनी किती खस्ता खाल्ल्या हे या संघातील खेळाडूंनी जवळून पाहिले होते. आडवली येथे होत असलेल्या क्रिकेट स्पर्धेची माहिती मिळाल्यानंतर किंजवडे घाडीवाडीचा संघ त्यात सहभागी झाला, साखळी सामने जिंकत थेट अंतिम सामन्यात त्यांनी धडक मारली.

अंतिम सामन्यात त्यांच्यासमोर उभा टाकला होता तो मालवण तालुक्यातील हडी गावचा क्रिकेट संघ. प्रथम फलंदाजी करताना किंजवडे घाडीवाडी संघाने सहा षटकात साठ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना हडी संघाने ५ चेंडू राखत अंतिम सामन्यात विजय होत स्पर्धेतील विजेतेपदाचा मान मिळवला, तर किंजवडे घाडीवाडी संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात उपविजेतेपदाचे बक्षीस व चषक स्वीकारताना किंजवडे घाडीवाडी संघाच्या कर्णधाराने आपल्या भावना व्यक्त करताना या स्पर्धेत आम्हाला का जिंकायचे होते व त्यातून जास्तीत जास्त आर्थिक मदत त्या माजी क्रिकेटपटूला करता येईल हा उद्देश होता, असे सांगितले. मात्र क्षेत्ररक्षणात काही चुका झाल्याने आमच्या हातून विजेतेपदाचे बक्षीस गेल्याचे सांगितले. विजेते ठरलो असतो तर काही अधिकची आर्थिक मदत करता आली असती, असे सांगितले.

Cricket Humanity Gesture
Goa Liquor Seizure | ४८ लाखांची गोवा दारू जप्त

किंजवडे संघाच्या कर्णधाराने आपल्या भावना व्यक्त केल्यानंतर मानवतेचा धर्म जोपासत मालवण हडी संघाचा कर्णधार अमोल गावकर व सहकारी खेळाडूंनी प्रथम विजेत्या बक्षीसाची रक्कम उपविजेत्या किंजवडे संघाकडे सुपूर्द केली व आपण उपविजेते पदाच्या बक्षीसाची रक्कम स्वीकारली. स्पर्धेत विजेतेपदासाठी १५हजार ५५५ तर उपयोजिते पदासाठी ११ हजार १११ असे बक्षीस होते. विजेत्या हडी संघाने उर्वरित ४ हजार रुपये क्रिकेटपटू सत्यविजय घाडी यांच्या मुलाकडे मैदानावरच सुपूर्त केली आणि विजेतेपदाचा चषक घेत हा संघ मोठ्या आनंदाने हडी गावाच्या दिशेने रवाना झाला.

किंजवडे घाडीवाडी संघाचा हा मानवतावादी उपक्रम लक्षात आल्यानंतर क्रिकेट स्पर्धेचे आयोजक असलेले श्री स्वामी गांगेश्वर मंडळ आडवली हेसुद्धा आर्थिक मदतीसाठी पुढे आले. त्यांनीही आजारी असलेल्या त्या माजी क्रिकेटपटू सत्यविजय गाडी यांना ५००० रुपयांची आर्थिक मदत जाहीर करत त्यांच्या मुलाकडे ती सुपूर्द केली. एकूणच किंजवडे घाडीवाडी संघाने केलेला संकल्प आणि त्याला मालवण हडी क्रिकेट संघ व स्पर्धेचे आयोजक आडवली श्री स्वामी गांगेश्वर मंडळ यांनी केलेले सहकार्य यातून आडवली गावातील त्या माळावरील मैदानात एक वेगळा आदर्श निर्माण झाला. खरंतर ग्रामीण भागात स्पर्धांचे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करणारे मंडळ व त्यात सहभागी होणाऱ्या संघातील क्रिकेटपटूंवर अनेक वेळा शेरेबाजी होत असते. हे काम सोडून कसले क्रिकेट खेळतात, पार्ष्या करून खातात असे शब्द अनेक वेळा अशा स्पर्धाच्या निमित्ताने खेळाडूंविषयी ऐकायला मिळत असतात. मात्र आडवलीच्या या मैदानावर अशाच ग्रामीण खेळाडूंनी माणुसकीचे अनोखे दर्शन घडविले.

Cricket Humanity Gesture
Sindhudurg News : विर्डी धबधब्याच्या जलकुंडात धारवाडचा पर्यटक बुडाला!

क्रिकेट स्पर्धेत उपविजेते होत व सोबत विजेत्या पदाचे बक्षीस घेऊन किंजवडे गावात मोठ्या आनंदात दाखल झालेल्या संघातील खेळाडूंचे घाडेवाडीतील ग्रामस्थ त्यांच्या कुटुंबीयांकडून जंगी स्वागत करण्यात आले सर्व खेळाडूंचे औक्षण करत त्यांनी गावी दिल्या या उपक्रमाचे घाडीवाडीतील ग्रामस्थांकडून तेवढ्याच आनंदाने कौतुक करण्यात आले. किंजवडे संघात सुमित घाडी, आशिष घाडी, सूरज घाडी, स्वप्नील घाडी, यश घाडी, नयन घाडी, तुषार घाडी, ओमकार घाडी, निशांत घाडी, शुभम घाडी, रोहित घाडी, मयुरेश घाडी, आयुष घाडी, विशाल घाडी, अथर्व घाडी हे सहभागी झाले होते. त्यांना मार्गदर्शन मंगेश घाडी यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news