

Sindhudurg Kudal cattle attack
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील सह्याद्री पट्ट्यात वसलेल्या हळदीचे नेरुर गावात आत्माराम शिवराम नाईक यांच्या गुरांच्या कळपावर सोमवारी (दि. २१) रात्री हल्ला झाला. या हल्ल्यात एका म्हैशीचा मृत्यू झाला असून, एक जनावर जखमी झाले आहे. तसेच तीन जनावरे अद्याप बेपत्ता आहेत. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नाईक कुटुंबीयांनी आणि स्थानिक ग्रामस्थांनी बेपत्ता जनावरांचा शोध सुरू केला आहे. मृत म्हैशीचा पंचनामा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी केला असून, जखमी म्हैस घरी परतली आहे. शेतकऱ्यांच्या मते, हा हल्ला वाघाने केला असावा, मात्र वनविभागाने हा हल्ला बिबट्याने केल्याचा दावा केला आहे.
आत्माराम नाईक यांच्या घराजवळील जंगलात हे जनावरे चरण्यासाठी सोडण्यात आली होती. संध्याकाळी गुरे परतली नाहीत म्हणून शोध घेतला असता, एक म्हैस मृतावस्थेत आढळून आली. तिच्या शरीरावर हल्ल्याचे स्पष्ट खुणा होत्या. उर्वरित जनावरांचा शोध सुरू असून, दोन दिवस उलटूनही त्यांचा थांगपत्ता लागलेला नाही.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी आणि पशुवैद्यकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनाम्यानंतर नुकसानभरपाई देण्यात येईल, असे वनक्षेत्रपाल संदीप कुंभार यांनी सांगितले. या हल्ल्यानंतर शेतकऱ्यांनी परिसरात वाघ किंवा बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
वनक्षेत्रपाल संदीप कुंभार यांनी सांगितले की, हळदीचे नेरुर परिसरात वाघ नसून बिबटे आहेत. नाईक यांच्या गुरांवर झालेला हल्ला बिबट्याने केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. मृत जनावराच्या नुकसानभरपाईसाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.