

कुडाळ : कुडाळ आगारातून दु.12.40 वा. सुटणारी एसटी गेले कित्येक दिवस उशिराने सुटत आहे. याबाबत कंट्रोलर कडून मुलांना उद्धट उत्तरे दिली जातात, हे यापुढे चालणार नाही. मुले शाळेसाठी स. 6 वा. घरातून बाहेर पडतात. त्यामुळे दुपारी 12.40 वा. च्या गाडीने येण्यासाठी मुलांची धावपळ असते, पण एसटीच्या नियोजनशून्य कारभारामुळे मुलांची परवड होत आहे. यासाठी व्यवस्थेत वेळीच बदल करा, अन्यथा गाठ आमच्याशी आहे, असा निर्वाणीचा इशारा तेंडोली, आंदुर्ले, माड्याचीवाडी गावातील सरपंचानी विद्यार्थी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत कुडाळ आगार व्यवस्थापक रोहित नाईक यांना दिला.
दररोज दु. 12.40 वा. सुटणारी कुडाळ-केळूस बस गेले काही दिवस वारंवार उशिराने सुटत आहे. याबाबत आगार व्यवस्थापकांचे लक्ष वेधूनही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे संतप्त सरपंच, ग्रामस्थ व शाळकरी मुलांनी शनिवारी कुडाळ आगार व्यवस्थापकांच्या दालनात धडक दिली. आगार व्यवस्थापक श्री. नाईक यांनी उद्यापासून एसटी वेळेवर सोडण्याची ग्वाही देत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला; मात्र उपस्थित सरपंचांनी त्यांना धारेवर धरले. कुडाळ-केळूस बस नियमीत वेळेत सोडणार आहात की नाही? याबाबत आम्हाला लेखी पत्र द्या, नुसती तोंडी आश्वासने नकोत, असे सांगून ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला. अखेर श्री. नाईक यांनी ही बसफेरी यापुढे नियोजित वेळेत सोडण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर ग्रामस्थांनी माघार घेतली.
यावेळी एका चालकाने कुडाळ-केळूस मार्गावर रस्ता दुतर्फा झाडांच्या फांद्या आल्या आहेत, त्यामुळे एसटीच्या काचा फुटण्याचा धोका असल्याकडे लक्ष वेधले. तेंडोली सरपंच अनघा तेंडोलकर व नीलेश तेंडुलकर यांनी तत्काळ सा. बां. अधिकार्यांशी संपर्क साधला. त्यांनी 14 जुलै रोजी त्या मार्गावरील रस्ता दुतर्फा झाडांच्या फांद्याची साफसफाई करून देण्याचे आश्वासन दिल्याचे निलेश तेंडुलकर यांनी सांगितले. माड्याचीवाडी सरपंच विग्नेश गावडे यांनी सायंकाळी 4.20 वा. ची कोचरा बस कोचर्यावरुन उशिरा येते याकडे आगार प्रमुखांचे लक्ष वेधले.
तेंडोली सरपंच अनघा तेंडोलकर, माड्याचीवाडी सरपंच विघ्नेश गावडे, आंदुर्ले सरपंच अक्षय तेंडोलकर, भाजपचे नीलेश तेंडुलकर, तेंडोली माजी सरपंच मंगेश प्रभू, संदीप प्रभू, रामचंद्र राऊळ, प्रताप राऊळ, सत्यवान तेंडोलकर, गजानन खानोलकर, सचिन तेंडोलकर, ग्रा. पं. सदस्य कवशल राऊळ व बाळू पारकर, शशिकांत तेंडोलकर, गजानन खानोलकर, राजन तेंडोलकर, विजय गोठोसकर, संदीप पेडणेकर, विद्यार्थी इशान पावस्कर, चैतन्य पेडणेकर, दर्शन खानोलकर, अमरेश साळुंखे,आर्यन आरवकर, दिनेश कुंभार, नेहा नाईक आदी उपस्थित होते.
कुडाळ आगारात पुरेशा एसटी बस उपलब्धता असताना सुद्धा अनेक मार्गांवरील एसटी वेळेत सुटत नाहीत, याला कारण एसटी अधिकार्यांचे नियोजनशून्य प्लॅनिंग, कर्मचार्यांचा मनमानीपणा आहे. एसटीच्या गॅरेजमध्ये आवश्यक पार्टची अनुपलब्धता, सीएनजी साठी 26 किमीचा फेरा अशा अनेक कारणामुळे आगारातून एसटी वेळेवर सुटत नाहीत. याचा सर्वाधिक त्रास शाळकरी मुलाना सहन करावा लागत आहे. दीड-दीड, दोन-दोन तास उशिराने एसटी बसेस जात आहेत,काही वेळा तर एसटी रद्द केल्याचे अर्धा तास अगोदरच कंट्रोलर जाहीर करून टाकतात. त्यामुळे मुलांची परवड होत आहे. याकडे आ. नीलेश राणे यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.