

कुडाळ : कुडाळमध्ये असलेल्या एमआयडीसी परिसरातील रात्री मध्यरात्री होणारे गैरप्रकार व चोर्या रोखण्यासाठी कुडाळ पोलिसांची एमआयडीसी परिसरावर आता कायमस्वरूपी करडी नजर आहे. गेल्या काही महिन्यांत या भागात दारू, सिगारेट, युवतींसोबत फिरणे अशासाठी एमआयडीसी परिसराचा वापर करणार्या सुमारे 16 जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. या 16 जणांना कुडाळ न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने प्रत्येकी 1 हजार 200 रू दंडात्मक कारवाई केली. अशी माहिती पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली.
कुडाळ एमआयडीसी परिसर हा शहरापासून काहीसा बाजूला आहे. संध्याकाळी या भागातील कंपन्या बंद झाल्यानंतर रस्ते व परिसर निर्मनुष्य होतात. या संधीचा गैरफायदा घेत रात्रीच्या वेळी एमआयडीसी भागात दारूच्या पार्ट्या रंगातात. सिगारेट ओढणारे, मित्र मैत्रिणी सोबत मौज मजा करणार्यांचा बिनधक्त वावर सुरू होतो. तसेच काही वेळा छोट्या-मोठ्या भंगार व इतर साहित्याच्या चोर्यांचेही प्रकार घडतात.
याबाबत पोलिसांकडे तक्रारी आल्या होत्या. पोलिसांनीही यांकडे लक्ष देत रात्रीचे पेट्रोलिंग सुरू करत कारवाई केली होती. मात्र कारवाईनंतर काही दिवसात परत हे सत्र सुरू व्हायचे. मात्र आता एमआयडीसी परिसरावर पोलिसांची कायमस्वरूपी करडी नजर राहणार आहे. पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या सूचनेनुसार एमआयडीसी परिसरात आता कायमस्वरूपी रात्रीचे पेट्रोलिंग सुरू करण्यात आले आहे. या पेट्रोलिंग दरम्यान दारू पार्टी करणे, सिगारेट ओढत बसणे, मुलींसोबत फिरणे अशा स्थितीत आढळलेल्या 16 जणांवर गेल्या काही महिन्यात पोलिसांनी कारवाई केली आहे. त्याच्याकडून न्यायालयामार्फत प्रत्येकी 1200 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या या कारवाईमुळे या भागातील चोर्यांच्या प्रमाणातही घट झाली आहे. काही महिन्यापूर्वी कुडाळ एमआयडीसी येथे जिल्हा पोलिस अधीक्षकांचे उद्योजकांसाठी मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी उद्योजकांनी रात्रीच्या वेळी एमआयडीसीमध्ये घडत असलेल्या प्रकारांबाबत जिल्हा पोलिस अधीक्षकांचेही लक्ष वेधले होते. याची पोलिस प्रशासनाने दखल घेत एमआयडीसी परिसर आता खाकीच्या नजरेखाली असणार असल्याचे स्पष्ट केले.