Tilari Ghat Crime | तिलारी घाटातील महिलेच्या खून प्रकरणाचा छडा; कर्नाटकातील बाप-लेकांसह तिघांना अटक

बेळगाव जिल्ह्यातील महिलेचा तिलारी घाटात खून केल्याची कबुली
Tilari Ghat Woman Death
कर्नाटकातील तीन संशयित आरोपींना अटक करण्यात आली Pudhari
Published on
Updated on

Tilari Ghat Woman Death

दोडामार्ग : तिलारी घाटातील जंगलात बेवारस अवस्थेत सापडलेल्या महिलेच्या खूनप्रकरणाचा अखेर पोलिसांनी थरारक उलगडा केला असून कर्नाटकातील तीन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. यात बाप-लेकांचा समावेश असून यल्लाप्पा महिलाप्पा करणावर (५७), बसवराज यल्लाप्पा करणावर (३३, दोघेही रा.राजकोटे, ता.हुक्केरी, जि. बेळगाव) आणि लगमाप्पा अंकलगी (३७, रा. केनवट्टी, ता. हुक्केरी, जि. बेळगाव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या तिघांनी मिळून बेळगाव जिल्ह्यातील गंगव्वा सत्त्याप्पा हंचीमणी (२५, रा. वंटमोरी, ता. जि. बेळगाव) हिचा तिलारी घाटात खून केल्याची कबुली दिली आहे.

२९ मे २०२६ रोजी कोदाळी ते दोडामार्ग मार्गावरील तिलारी घाटातील प्रेशर पाॅईंटजवळ एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला होता. चंदगड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला. शवविच्छेदन अहवालात डोक्यावरील गंभीर दुखापतीमुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर हा खून असल्याचे निष्पन्न झाले. अज्ञात आरोपींनी स्टीलच्या शॉक ॲब्झॉर्बर पाईपसारख्या हत्याराने महिलेच्या डोक्यावर वार करून तिचा खून केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जंगलात फेकून दिल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता.

Tilari Ghat Woman Death
Tilari ghat | तिलारी घाटात निर्जन ठिकाणी महिलेच्या मृतदेहापाठोपाठ आढळली बेवारस स्कूटर! प्रकरणाचे गूढ वाढले

तब्बल १९९ बेपत्ता लोकांची घेतली माहिती

या गंभीर गुन्ह्याची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला तपासाची सूत्रे दिली. पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पथके तयार करून तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यात आली. तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळी मिळालेल्या वस्तू, कपडे, दागिने आणि छायाचित्रांच्या आधारे महिलेची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूरसह सांगली, सिंधुदुर्ग, गोवा आणि कर्नाटक राज्यातील तब्बल १९९ बेपत्ता महिलांची माहिती तपासण्यात आली.

सीसीटीव्ही फुटेज आले कामी

याचवेळी तिलारी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण करण्यात आले. तपासादरम्यान २५ मे रोजी तिलारी घाटातून जाणारी एक संशयास्पद क्रूझर गाडी पोलिसांच्या नजरेस पडली. ही गाडी अवघ्या २० मिनिटांत पुन्हा घाटातून परतताना दिसून आली होती. त्याचवेळी गाडीचा अपघात झाल्याची माहितीही समोर आली. या धाग्याच्या आधारे तपास अधिक वेगाने पुढे सरकला. पुढील तपासात बेळगाव परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये मृत महिला एका पल्सर मोटारसायकलवरून संशयितासोबत जाताना दिसली. पोलिसांनी बेळगाव ते हुबळीदरम्यान सुमारे ११० किलोमीटरपर्यंत सीसीटीव्ही फुटेजचा मागोवा घेत तांत्रिक विश्लेषण केले.

Tilari Ghat Woman Death
Tilari Ghat Accident : तामिळनाडूतील पर्यटकांच्या गाडीला तिलारी घाटात अपघात; तिघे गंभीर

संशयित आरोपींचा लागला छडा

त्यातून बसवराज करणावर याचे नाव निष्पन्न झाले. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला बसवराज हा आपल्या साथीदारांसह शिनोळी परिसरात फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी पल्सर मोटारसायकलसह तिघांना ताब्यात घेतले. कसून चौकशीत त्यांनी गंगव्वा हिचा तिलारी घाटात नेऊन खून केल्याची कबुली दिली. या प्रकरणातील आणखी एक संशयित क्रूझर वाहनचालक अपघातात जखमी झाला असून त्याच्या खांद्याचे हाड मोडल्यामुळे तो घरी उपचार घेत आहे. त्यामुळे त्याला अद्याप ताब्यात घेता आलेले नसून पोलिसांचा तपास सुरू आहे.

यांनी लावला प्रकरणाचा छडा

ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस निरीक्षक निंगाप्पा चौखंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक विजय कोळेकर, शेष मोरे, अतिष म्हेत्रे तसेच त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

Tilari Ghat Woman Death
Tilari Ghat Accident | तिलारी घाटात 100 फूट खोल दरीत कोसळला ट्रक

संशयित आरोपींना येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १५ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती चंदगड पोलीस निरीक्षक निंगाप्पा चौखंडे यांनी 'दै. पुढारी'शी बोलताना दिली.

चंदगड पोलिसांनी अवघ्या काही दिवसातच या प्रकरणाचा छडा लावल्याने त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे. संशयित आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले असले तरी त्यांनी त्या महिलेचा खून नेमका कशासाठी केला असावा? संशयित आरोपींनी या घाटातील रेकी केली होती का? असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news