

दोडामार्ग : तिलारी घाटातील जयकर पॉईंट येथील तीव्र उताराच्या वळणावर एक मालवाहू ट्रक थेट 100 फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. यात चालक शशी कुमार पी (40, रा., शिमोगा, भद्रावती) व वाहक विजय गुप्ते (38, रा. अंकली, ता.चिकोडी, कर्नाटक) गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी बेळगाव येथील केएलई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात ट्रकचे चार तुकडे झाले आहेत. शनिवारी दुपारी 1.30 वा. च्या सुमारास हा अपघात झाला.
चालक शशी कुमार पी हे आयशर ट्रक घेऊन शनिवारी सकाळी कर्नाटकहून तिलारी घाटमार्गे गोवा येथे जात होते. त्यांच्यासोबत विजय गुप्ते हे होते. घाट उतरत असताना जयकर पॉईंट येथील तीव्र उतारावर चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. चालकाने बचाव करण्यासाठी ट्रकातून बाहेर उडी मारली, तर विजय हे गाडीबाहेर फेकले गेले. यावेळी चालक एका कठड्यावर आढळून गंभीर जखमी झाले. तर विजय हे सुद्धा जखमी झाले. ट्रक थेट 100 फूट खोल दरीत कोसळला. अपघाताचे वृत्त वीजघर येथील तपासणी नाक्यावर कर्तव्य बजावत असलेले पोलिस विजय जाधव व किरण आडे यांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
दोघांनीही जखमींना त्यांच्या खासगी गाडीतून चंदगड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अपघातात चालक गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. तर वाहक विजय गुप्ते याचा एक हात मनगटातून तुटला आहे. घटनास्थळी मॅगी पाकीटाची प्लास्टिक रोल आढळून आल्याने हा ट्रक गोवा येथे सर्व रोल घेऊन जात असल्याचा अंदाज वर्तविला जात होता.
या अपघाताची भीषणता इतकी तीव्र होती की ट्रकचे केबिन, इंजिन, हौदा व चाके अशा चार विभागात तुकडे झाले. जयकर पॉईंट येथील तीव्र उतारावर चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक वेगाने जाऊ लागला. येथील तुटलेल्या संरक्षक कठड्यावर जाऊन तो जोरात आदळला व तेथून उसळी घेऊन थेट दरीत कोसळला.