Sindhudurg News : विर्डी धबधब्याच्या जलकुंडात धारवाडचा पर्यटक बुडाला!

दोडामार्ग पोलिसांकडून शोध सुरू
Sindhudurg News
विर्डी धबधब्याच्या जलकुंडात धारवाडचा पर्यटक बुडाला!
Published on
Updated on

दोडामार्ग : दोडामार्ग-विर्डी येथील निसर्गरम्य पण धोकादायक वझर सखल धबधब्याच्या कुंडात पोहताना कर्नाटकातील धारवाड येथील विजय दोडमणी (२३) हा युवक बुडाला. सायंकाळपर्यंत त्याचा मृतदेह हाती लागलेला नव्हता. दोडामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली. १४ वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेची ही पुनरावृत्ती असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

गुरुवारी सकाळी ११.३० वा. धारवाड येथील काही तरुण दुचाकींवरून पर्यटनासाठी विर्डीत आले होते. उंच कड्यावरून कोसळणारा धबधबा आणि खाली तयार झालेले विशाल जलकुंड पाहून युवकांना आंघोळ करण्याचा मोह आवरता आला नाही. युवक पोहण्यासाठी कुंडात उतरले दरम्यान काही वेळात विजय दोडमणी अचानक पाण्यात गडप झाला. मित्रांनी व इतर पर्यटकांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; मात्र यश आले नाही. घटनेची माहिती ग्रामस्थांनी दोडामार्ग पोलिसांना दिली. पोलिस निरीक्षक हेमचंद्र खोपडे, हेड कॉन्स्टेबल वसंत देसाई बाळकृष्ण धर्णे, पोलिस नाईक मानसी गावडे, शिपाई अभिजित कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने शोधकार्य सुरू केले आहे. मात्र, कुंडाची खोली अत्यंत जास्त असल्याने शोधमोहीमेला अडचणी येत आहेत.

मृत्यूचा सापळा ठरलेले कुंड

वझर धबधबा उंचावरून कोसळत असल्याने त्याच्या पायथ्याशी अतिशय खोल आणि विस्तीर्ण कुंड तयार झाले आहे. या कुंडाची नेमकी खोली किती आहे? याची माहिती स्थानिकांनाही नाही. त्यामुळे या ठिकाणी पोहणे अत्यंत धोकादायक मानले जाते.

१४ वर्षांपूर्वीही घडली होती अशीच दुर्घटना

या धबधब्यावर १८ नोव्हेंबर २०१२ रोजी गावातील एका युवकाचा याच कुंडात बुडून मृत्यू झाला होता. त्यावेळी शोधासाठी सातारा येथील पाणबुडींनाही पाचारण करण्यात आले होते; मात्र अनेक दिवस शोध घेऊनही मृतदेह सापडला नव्हता. अखेर सहाव्या दिवशी मृतदेह पाण्यावर तरंगून आला होता. ती घटना व आजची घटना यात तारीख १८ असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे या घटनेची आठवण आजही ग्रामस्थांच्या मनात ताजी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news