Sindhudurg Crime: कोंबड्यांच्या झुंजीच्या नावाखाली सट्टा-जुगाराचे आयोजन; आठ जणांवर गुन्हा दाखल
कुडाळ : कोंबड्यांच्या झुंजीच्या नावाखाली सट्टा-जुगाराचे आयोजन आणि जाहिरात करून प्रसिद्धी केल्याप्रकरणी आठ जणांविरुद्ध कुडाळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई शुक्रवारी (दि. १७) सायंकाळी पाच वाजता करण्यात आली. याप्रकरणी कुडाळ पोलिस ठाण्यातील संजय भगवान कदम (वय ४६) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, १९ ऑक्टोबर रोजी कुडाळ येथे कोंबड्यांची झुंज आयोजित केली होती. त्यावर सट्टा-जुगार खेळवला जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या झुंजीसंदर्भातील जाहिरातीचे चार फोटो गुप्त माहितीदाराकडून पोलिसांना व्हॉट्सअॅपवर मिळाले. तपासाअंती पोलिसांनी खात्री करून घेतली असता जियाद खान (रा. पिंगुळी-गोंधीयाळी), साद शेख (रा. मज्जीद मोहल्ला, कुडाळ), अभिषेक नारायण काणेकर (रा. माणगाव-कट्टागाव), अरमान फैय्याज कर्णेकर (रा. कर्णेकर चाळ, कुडाळ बसस्थानक मागे), अंजार कुल्ली (रा. माणगाव), महेश साटेलकर (रा. मळेवाड, सावंतवाडी), गोसावी (रा. मधली कुंभारवाडी, कुडाळ), ऑन इब्राहीम शेख (रा. मज्जीद मोहल्ला, कुडाळ) आणि एक अनोळखी इसम असे एकूण आठजण झुंजीत स्पर्धक म्हणून सहभागी होणार होते. या झुंजीत प्रेक्षकांनी उपस्थित राहावे तसेच सट्टा-जुगारात सहभागी व्हावे, यासाठी आयोजकांनी कोंबड्यांसह स्पर्धकांचे छायाचित्र असलेली जाहिरात प्रसारित केली होती. आयोजक आणि स्पर्धकांनी आपसात संगनमत करून झुंजीच्या माध्यमातून सट्टा-जुगाराचे आयोजन केले असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले. त्यामुळे या आठ आरोपींविरुद्ध कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

