

केज : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात एक अत्यंत खळबळजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. एका सवर्ण समाजातील तरुणाने आदिवासी समाजातील अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तब्बल दहा वर्षांपासून तिच्यावर सतत लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या नराधमाविरोधात बलात्कार, पोक्सो आणि ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नेमकं काय घडलं?
केज तालुक्यातील एका गावात, दहा वर्षांपूर्वी सवर्ण समाजाच्या संभाजी दत्तू ढगे नावाच्या तरुणाने पीडित आदिवासी अल्पवयीन मुलीवर पहिल्यांदा बलात्कार केला. त्यानंतर त्याने पीडितेला लग्नाचे खोटे आश्वासन देत, तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार शारीरिक संबंध ठेवले. दरम्यान, पीडित मुलगी सज्ञान झाल्यानंतर तिच्या आई-वडिलांनी तिचे लग्न धाराशिव जिल्ह्यातील तिच्याच समाजातील तरुणासोबत लावून दिले.
लग्नानंतरही छळ आणि नवऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
पीडितेचे लग्न झाले असतानाही आरोपी संभाजी ढगे तिचा पाठलाग करत असे. तो तिच्या सासरी जाऊन तिच्या पतीला मारहाण करून तिच्यावर बळजबरीने शारीरिक अत्याचार करत होता, तसेच धमक्याही देत होता. या अत्याचारातून ती तरुणी गरोदर राहिली. ही बाब सासरच्या लोकांना समजताच त्यांनी तिला माहेरी आणून सोडले.
जात दाखवून घराबाहेर काढले
आरोपी आणि कुटुंबाच्या छळाला कंटाळून पीडितेच्या पतीने विषारी द्रव्य प्राशन करून दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्नही केल्याचे उघड झाले आहे. सात महिन्यांची गरोदर असलेली पीडिता माहेरी परतल्यानंतर ती आरोपी संभाजी ढगे याच्या घरी राहिली आणि तिने लग्नाचा हट्ट धरला. परंतु, गरोदरपणाचे कारण देत आरोपीने लग्नास टाळाटाळ केली. तिने मुलाला जन्म दिल्यानंतर काही काळ ढगे कुटुंबाने मुलाचा सांभाळ केला. मात्र, काही दिवसांनी आरोपीच्या कुटुंबीयांनी त्याला कामधंद्यासाठी बाहेरगावी पाठवले. त्यानंतर आरोपीचा भाऊ आणि आई-वडील यांनी "तू हलक्या जातीची आहेस" असे बोलून त्या आदिवासी तरुणीला तिच्या लहान बाळासह घराबाहेर हाकलून दिले. आरोपी संभाजी ढगे यानेही 'आदिवासी असल्याने' लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला.
पोलिसात गुन्हा दाखल:
वर्षभर वाट पाहूनही आरोपीने लग्न न केल्याने पीडितेने अखेर पोलीस ठाणे गाठले. दि. १५ ऑक्टोबर रोजी पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी संभाजी दत्तू ढगे याच्याविरुद्ध भा. दं. वि. कलम ३७६(३) (बलात्कार), ३६६ सह पोक्सो कायद्याचे कलम ४, ६, ८ तसेच ॲट्रॉसिटी कायद्याचे कलम ३(२), ३(व्ही), ३(१)(डब्ल्यू)(i), ३(१) (एक्स व्ही)(iii) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपास IPS अधिकाऱ्याकडे:
या गंभीर प्रकरणाचा तपास नव्याने रुजू झालेले आयपीएस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकट राम हे करत आहेत. पीडितेने यापूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत काँवत हे केज दौऱ्यावर आले असता त्यांची भेट घेऊन आपल्यावर झालेल्या अत्याचाराची कहाणी सांगितली होती.