

शिरगाव : सण-उत्सवांच्या नावाखाली होणार्या दारूच्या पार्ट्या आणि तरुणाईला विळखा घालणारे ड्रग्जचे व्यसन, या समाजाला लागलेल्या किडीविरोधात साळशी गावात जनजागृतीचा प्रभावी जागर करण्यात आला. व्यसन ही केवळ वैयक्तिक सवय नाही, तर ती समाजाला पोखरून काढणारी कीड आहे. प्रत्येकाने स्वतःपासून निर्व्यसनी राहण्याचा संकल्प केल्यास, आपण पुढच्या पिढीला एक निरोगी आणि निकोप भविष्य देऊ शकतो, असे परखड मत नशाबंदी मंडळ सिंधुदुर्गच्या जिल्हा संघटक सौ. अर्पिता मुंबरकर यांनी व्यक्त केले.
येथील केंद्रशाळा साळशी येथे ‘नशामुक्त भारत’ अभियानांतर्गत आयोजित व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रमात त्या बोलत होत्या. समाज कल्याण विभाग (जि. प. सिंधुदुर्ग), नशाबंदी मंडळ मुंबई (शाखा सिंधुदुर्ग), साळशी ग्रामपंचायत आणि पोलिसपाटील कामिनी नाईक यांच्या संयुक्त विद्यमाने हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच वैशाली सुतार होत्या. व्यासपीठावर उपसरपंच पांडुरंग मिराशी, पोलिसपाटील कामिनी नाईक, माजी सरपंच वैभव साळसकर, विशाखा साळसकर, मुख्याध्यापक माणिक वंजारे, गंगाधर कदम यांच्यासह अनेक मान्यवर, ग्रामस्थ, महिला आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली; पण खर्या अर्थाने जनजागृतीची ज्योत पेटली ती विद्यार्थ्यांच्या प्रभातफेरीने. साळशी हायस्कूल ते केंद्रशाळेपर्यंत निघालेल्या या फेरीत विद्यार्थ्यांच्या व्यसनविरोधी घोषणांनी परिसर दणाणून गेला. विशेषतः हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘व्यसनमुक्तीची वारी... विठ्ठलाच्या दारी’ ही अभिनव संकल्पना राबवत, संतांच्या आणि महापुरुषांच्या विचारांचा संदेश घराघरांत पोहोचवला. हा उपक्रम सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ठरला.
सरपंच वैशाली सुतार यांनी मुलांशी संवाद साधताना सांगितले, चांगल्या सवयी आणि वाईट सवयी यातील फरक लहान वयातच समजला पाहिजे. जर बालवयातच चांगले संस्कार रुजले, तर भविष्यात कोणतीही शक्ती तुम्हाला व्यसनाच्या मार्गावर नेऊ शकणार नाही. त्यांनी मोबाईलच्या सदुपयोगावर भर देत ‘स्वस्थ राहा, सुखी राहा’ असा मोलाचा संदेश दिला. यावेळी सौ. मुंबरकर यांनी नशाबंदी मंडळाचे ‘महामानवांचे व्यसनमुक्तीपर विचार’ हे पुस्तक शाळेला भेट दिले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संजय मराठे यांनी केले.
उत्सवांचा आनंद दारूच्या पार्ट्यांनी साजरा करण्याची वाढती प्रथा समाजासाठी अत्यंत घातक असल्याचे सौ. मुंबरकर यांनी अधोरेखित केले.
दारू, तंबाखू, गुटखा आणि ड्रग्जमुळे देशाची तरुण पिढी बरबाद होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.
संत-महात्म्यांचे विचार आणि आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाज व्यसनमुक्त करण्याचे आवाहन त्यांनी केले.
ड्रग्जमुळे देशात वर्षाला 13 लाख तरुणांचा मृत्यू जगामध्ये भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो, पण ही ओळख धोक्यात आली आहे. आपल्या देशात दरवर्षी तब्बल 13 लाख तरुण ड्रग्जच्या व्यसनामुळे मृत्युमुखी पडतात, ही अत्यंत चिंताजनक आणि धक्कादायक बाब आहे. वेळीच सावध होऊन तंबाखूजन्य पदार्थांना दूर सारा आणि आपले आयुष्य वाचवा, असा भावनिक आणि गंभीर इशारा सौ. अर्पिता मुंबरकर यांनी दिला.