

सावंतवाडी : असनिये-वायंगणवाडी येथे विद्युत भारित वीज वाहिनी कोसळून बैल ठार झाल्याच्या निषेधार्थ संतप्त ग्रामस्थांनी मंगळवारी सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत तब्बल पाच तास आंदोलन केले. ग्रामस्थांनी जीर्ण वीज वाहिनी आणि विद्युत खांब बदलण्याची मागणी करत ठिय्या मांडला होता. महावितरण अधिकार्यांनी येत्या सोमवारपर्यंत कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर रात्री उशिरा आंदोलन मागे घेण्यात आले.
गावातील अनेक समस्यांबाबत वारंवार लक्ष वेधूनही महावितरणने दुर्लक्ष केल्यामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप आंदोलक ग्रामस्थांनी केला. जोपर्यंत सुरळीत वीजपुरवठा तसेच जीर्ण झालेल्या वीज वाहिन्या व खांब बदलण्याबाबत ठोस लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला होता. यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
ग्रामस्थांच्या आंदोलनाची माहिती मिळताच बांदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ग्रामस्थ लेखी आश्वासनावर ठाम राहिले. अखेर, सावंतवाडीचे उपअभियंता शैलेंद्र राक्षे यांनी सोमवारी गावातील जीर्ण वीज वाहिनी व खांब बदलण्याच्या कामाला सुरुवात करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.
संतप्त ग्रामस्थांनी, जर सोमवारपासून कामाला सुरुवात झाली नाही, तर बुधवार, 16 जुलै रोजी सावंतवाडीतील महावितरण कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.