

Women Empowerment In Police
कणकवली : कणकवली तालुक्यातील पिसेकामते-फळसेवाडी गावच्या सुकन्या नयोमी दशरथ साटम (आयपीएस) यांची सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अतिरिक्त पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. चंद्रपूर येथे सहायक पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या नयोमी साटम यांच्या रूपाने आपल्याच जिल्ह्यात उच्च पदावर सेवा बजावण्याचा बहुमान मिळवणार्या त्या पहिल्याच सिंधुकन्या ठरल्या आहेत. त्यांच्या या नियुक्तीमुळे जिल्ह्याच्या पोलीस दलाला एक तरुण आणि कर्तव्यदक्ष अधिकारी लाभला आहे.
मुंबईतील सेंट झेवियर्स महाविद्यालयातून अर्थशास्त्रात पदवी घेतल्यानंतर नयोमी यांनी प्रशासकीय सेवेत जाण्याचा निश्चय केला होता.
कोरोनाच्या आव्हानात्मक काळातही अभ्यास सुरू ठेवत त्यांनी 2020 मध्ये पहिल्याच प्रयत्नात केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) परीक्षा उत्तीर्ण करत 162 व्या क्रमांकाने ‘आयपीएस’ रँक मिळवली. त्यांचे वडील दशरथ साटम हे सीए असून, त्यांचे कुटुंब सध्या मुंबईत स्थायिक आहे.
आयपीएस प्रशिक्षणानंतर त्यांची पहिली नियुक्ती सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे झाली. त्यानंतर त्यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या सहायक पोलीस अधीक्षक म्हणून यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली. आता त्यांना सिंधुदुर्गच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षकपदी बढती मिळाली आहे. एका भूमीपुत्रीला जिल्ह्याच्या पोलीस दलात इतके मानाचे पद मिळाल्याने सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पिसेकामते ग्रामस्थ आणि फळसेवाडी हितकारी संस्थेनेही त्यांच्या निवडीबद्दल विशेष आनंद व्यक्त केला आहे.