

कुडाळ : पुढारी वृत्तसेवा
कुडाळ येथील सिंधुसरस प्रदर्शनात आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी लोक आग्रहास्तव चिमणी पाखरं डान्स अॅकॅडमीच्या कलाकारांसमवेत नृत्याविष्कार सादर करीत उपस्थितांची मने जिंकली. चिमणी पाखरं डान्स अकॅडमीचा 'जलवा' या डान्स शो चे आयोजन सिंधुसरस प्रदर्शनात करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमीसे यांनी 'अवतरली तारका' या गाण्यावर नृत्याविष्कार सादर करून चिमणी पाखरंच्या कलाकारांना प्रोत्साहन दिले. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सिंधुदुर्ग मार्फत उमेद अभियान अंतर्गत कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर सिंधुसरस प्रदर्शन सुरू आहे.
सोमवारी सायंकाळी येथे चिमणी पाखरं डान्स ग्रुपच्या जलवा हा डान्स शो झाला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे सोबत कुडाळ तहसीलदार सचिन पाटील, गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक उदय पाटील, उमेदचे जिल्हा व्यवस्थापक वैभव पवार, तालुका अभियान व्यवस्थापक गणेश राठोड आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
रसिक प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात चिमणी पाखरं डान्स अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष रवी कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली जलवा डान्स शोला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्यासह उपस्थित अधिकारी स्टेजसमोर बसून कार्यक्रम पाहत होते.
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांना संगीत व नृत्याची आवड आहे. त्यामुळे उपस्थित कलाकार व अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी धोडमिसे यांना नृत्याविष्कार सादर करण्याची विनंती करण्यात आली. या विनंतीला मान देत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी थेट स्टेजवर दाखल होत चिमणी पाखरंच्या कलाकारांसमवेत नृत्याविष्कार सादर केला.
'अवतरली तारका' गाण्यावर त्यांनी कलाकारांसमवेत नृत्याचा ठेका धरीत उपस्थितांची मने जिंकली तसेच चिमणी पाखरंच्या कलाकारांना प्रोत्साहन दिले. उपस्थित रसिक प्रेक्षकांनी टाळ्या वाजवत नृत्याविष्काराला दाद दिली.
जिल्हाधिकाऱ्यांकडून 'चिमणी पाखर'च्या कलाकारांचे कौतूक
जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी मार्गदर्शन करताना, सिंधुसरस कार्यक्रमासह कलाकारांचे कौतुक केले. या कार्यक्रमा निमित्ताने कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळाली आहे हे निश्चितच कौतुकास्पद आहे. उमेद अभियान अंतर्गत महिला बचत गटांनी मांडलेल्या विविध उत्पादनांचे स्टॉल्सबाबतही त्यांनी समाधान व्यक्त केले. चिमणी पाखरं डान्स अॅकॅडमीच्या कलाकारांचे व नृत्य दिग्दर्शक रवी कुडाळकर यांचेही त्यांनी कौतुक केले. जिल्हाधिकाऱ्यांनी जवळपास तासभर कार्यक्रमाला उपस्थित राहून, कार्यक्रमाचा आनंद घेतला.