

आरवली ः डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून जिल्ह्यात पारा झपाट्याने खाली घसरला असून कडाक्याची थंडी सुरू झाली आहे. हे वातावरण आंबा व काजू पिकास पोषक असल्यामुळे आंबा व काजू बागा मोहरू लागल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून हवामान सतत बदलत होते. त्यामुळे आंबा व काजू फळपिकांवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र आता वाढलेल्या थंडीने शेतकऱ्यांना आंबा व काजू पिकाला अनुकूल अशा हवामान बदलाची चाहूल दिली आहे. या पोषक वातावरणामुळे आंबा कलमांना मोठ्या प्रमाणात मोहोर येण्यास सुरूवात झाली आहे.
काही ठिकाणी कलमांना पूर्णत: मोहोर आला तर काही ठिकाणी पालवीतून मोहोर आला आहे. मात्र कलमांना आलेल्या मोहोरात निकृष्ट मोहोराचे (वांझ) प्रमाण जास्त आहे. तरी मोठ्या प्रमाणात मोहोर आल्याने आंबा बागायतदारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. थंडीमुळे मोठ्या प्रमाणात मोहोर आला तरी झाडावर ‘बूंद’ दिसली तरच फलधारणा चांगली होईल, असे बागायतदारांचे म्हणणे आहे. दरम्यान कलमांवर तुडतुडे आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुभार्व दिसूल लागल्याने त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी बागायतदारांकडून कीटकनाशकांची फवारणी केली जात आहे.