

मंडणगड : मागील आंबा मोसमात मे महिन्याच्या पूर्वाधातच हजेरी लावलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे तालुक्यातील आंबा उत्पादनावर परिणाम होऊन लहान-मोठ्या आंबा उत्पादक शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. याबाबत निवेदने व पत्रप्रपंच करूनदेखील आंबा नुकसान भरपाईबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. आता नवीन हंगाम सुरु झाला आहे, पण मागील हंगामात आंब्याच्या नुकसानीमुळे आर्थिकदृष्ट्या कंबरडे मोडल्याची भावना शेतकर्यांनी बोलून दाखवली.
साधारणपणे हापूससाठी वर्षभर मेहनत कऱणार्या आंबा बागायतदारांचा आंबा मार्च, एप्रिल महिन्यापासूनच मुंबईच्या बाजारात विकला जातो व त्यांचे सर्व काढे मे महिन्याच्या पूर्वार्धात पूर्ण होतात. शिवाय मे महिन्यात तयार होणार्या आंबा पिकास स्थानिक पातळीवरच उत्तम बाजारपेठ उपलब्ध होते. शेतकर्याला विनासायास पैसे मिळून जातात. मात्र मागील आंब्याच्या मोसमात (2024 -25) हंगामात मे महिन्यात किमान चार ते पाच दिवस वादळी वार्यासह झालेल्या पावसामुळे आंबा व्यावसायिक स्थानिक शेतकर्यांचा आंब्याचा भाव पडला होता.
पावसामुळे आंब्याची बाजारपेठेतील मागणी कमी होते. शिवाय सततच्या गारव्यामुळे आंबा योग्य पिकत नाही, असा आंबा फळ प्रक्रियेसाठी वापरला जातो. येथे मात्र भाव पाडून आंब्याची विक्री करावी लागते. अवकाळी पावसाच्या नैसर्गिक संकटामुळे आंबा व्यावसायिक अडचणीत आले होते. यासंदर्भात नुकसानभरपाईच्या मागणीकडे शासनाने सपशेल दुर्लक्ष केल्याचे आंबा बागायतदार व शेतकर्यांचे म्हणणे आहे. नवीन हंगाम सुरु झाला असला तरी तूर्तास तरी आर्थिकदृष्ट्या कंबरडे मोडले असल्याने शासनाने आंबा बागायतदारांच्या नुकसानभरपाईच्या मागणीचा विचार करावा, अशी मागणी होत आहे..
आंबा बागायतदारांकडे शासनाचे दुर्लक्ष
आंबा उत्पादक शेतकरी मागील हंगामात मान्सूनपूर्व पावसामुळे पीक हाती येण्याआधीच अडचणीत आला. सुमारे 50 टक्के आंबा उत्पादन हाती न आल्याने शेतकर्यांचे फार मोठे नुकसान झाले. मात्र यासंदर्भात शासनाकडून यासंदर्भात कोणताही विचार झाला नाही. शासनाकडून नुकसानभरपाई देवून शेतकर्यांना दिलासा देण्याची अपेक्षा होती. तालुक्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असलेल्या या व्यवसायास शासनाने नुकसान भरपाईने सहकार्य करावे, अशी मागणी अडखळ येथील आंबा बागायतदार विजय शिंदे यांनी केली आहे.