

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्याच्या विकासात तुमचे योगदान आहे. मात्र राजकीय विरोधक तुमचे योगदान मान्य करणार नाहीत, कारण त्यांना विकासापेक्षाही राजकारण महत्वाचे आहे. असे असले तरी तालुक्यातील प्रत्येक गावात तुम्हाला मानणारा कार्यकर्ता, ग्रामस्थ आहे. कारण विकासाची प्रक्रिया तुम्ही गावागावांत पोहचवली आहे. तुम्ही कोणताही निर्णय घ्या, आम्ही तुमच्यासोबत राहू, अशी भूमिका तालुक्यातील एकनाथ नाडकर्णी समर्थक भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कार्यकर्ता मेळाव्यात मांडली.
तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांचा मणेरी येथे बुधवारी कार्यकर्ता मेळावा झाला. या मेळाव्यात तालुक्यातील तळगाळातून पुरुष व महिला कार्यकर्त्यांनी शेकडोच्या संखेने उपस्थिती लावली होती. गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाच्या वरिष्ठांकडून भाजपचा एक प्रामाणिक कार्यकर्ता असलेल्या एकनाथ नाडकर्णी यांच्यावर कार्यवाही करून त्यांना सहा वर्षासाठी पक्षातून निलंबित केले. त्यामुळे एकनाथ नाडकर्णी यांचे राजकीय दृष्ट्या काम थांबले आहे. या मुळे एकनाथ नाडकर्णी समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
वरिष्ठांना याबाबत कळवूनही वरिष्ठ याकडे लक्ष देत नसल्याने एकनाथ नाडकर्णी यांनी आपली राजकीय दिशा ठरवावी यासाठी त्यांच्या समर्थकांनी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करून नाडकर्णी यांना पाठिंबा दर्शविला आहे. कल्पना बुडकुले, आनंद तळणकर, अॅड. दाजी नाईक, मोरगाव सोसायटी चेअरमन श्री. ठाकूर, कळणे सरपंच अजित देसाई, तळकट सरपंच सुरेंद्र सावंत-भोसले, माजी सरपंच श्री. धुरी, भाजपा युवामोर्चा तालुका उपाध्यक्ष दिलखुश देसाई, सासोली उपसरपंच अनिरुद्ध फाटक यांसोबत अनेक आजी-माजी कार्यकर्ते उपस्थित होते. एकनाथ नाडकर्णी यांच्या बद्दलचे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. श्री.नाडकर्णी हे लहान -मोठ्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालणारे तालुक्यातील नेते आहेत. त्यांनी कधीही आपल्या कार्यकर्त्यांसोबत राजकारण केलेले नाही किंवा आपल्या कार्यकर्त्यांना त्रास दिलेला नाही. उलट कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून त्यांनी पाठिंबा दिलेला आहे.
या मेळाव्यात फक्त नाडकर्णी यांच्या प्रेमापोटीच शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहिले आहेत. नाडकर्णी साहेब, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. तुम्ही राजकारणामध्येच पूर्णतः सक्रिय व्हायलाच पाहिजे. तुम्ही जो निर्णय घेणार तो आम्हाला मान्य आहे. आम्ही सर्व कार्यकर्ते आपल्या पाठीशी आहोत. असा एकच आवाज उपस्थित कार्यकर्त्यांनी केला.
भाजपा पक्षाच्या वरिष्ठांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका पूर्वी पक्षात सामील करून घेतले पाहिजे. आम्ही जमलेले सगळे भाजपाचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहोत. वरिष्ठांनी तसा निर्णय न घेतल्यास आम्हां कार्यकर्त्यांना विचार करावा लागेल. कारण आम्हीं नाडकर्णी सारख्या सर्वसमावेशक नेत्याला कधीही सोडून जाणार नाही. ते ठरवतील त्याच दिशेने आम्हीं जाणार असल्याचे सांगितले.