

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्याला मंगळवारी मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. तालुक्यातील लहान पूल, कॉजवे पाण्याखाली गेल्याने शिवाय पर्यायी रस्ते वाहून गेल्याने त्या गावांचा संपर्क तुटला आहे. ठिकठिकाणी झाडांची पडझड झाली आहे. तिलारी घाटाच्या पायथ्याशी डोंगरातील चिखल आला आहे. तर येथील राणेवाडी येथे रस्त्यावर पाणी आल्याने रस्त्याला नदीचे स्वरुप प्राप्त झाले. परिणामी वाहतूक ठप्प झाली. साटेली- भेडशी येथील एक घर व आस्थापनेवर झाड पडल्याने नुकसान झाले.
तालुक्यात सोमवारी रात्रीपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. मात्र मंगळवारी पावसाचा अधिकच जोर धरला. पावसामुळे नदी- नाल्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. परिणामी तालुक्यातील सखल पूल, कॉजवे पाण्याखाली गेले. शिवाय तालुक्यात अनेक गावांना जोडणार्या पुलाचे काम करताना निर्माण केलेले पर्यायी रस्ते वाहून गेले. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
साटेली-भेडशी वरचा बाजार येथे एक झाड घर व आस्थापनेवर कोसळले. यात छप्पराचे पत्रे फुटले. झाड पडत असताना आवाज आल्याने सर्वांनी तेथून पळ काढल्याने ते बालंबाल बचावले. मात्र घर व आस्थापनाचे यात मोठे नुकसान झाले आहे. स्थानिकांनी कटरच्या साह्याने ते झाड कापले व जेसीबीच्या सहायाने ते बाजूला केले.
अतिवृष्टीमुळे वीजघर-राणेवाडी येथे रस्त्यावर पाणी आले. या रस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त झाले. रस्त्यावर गुडघाभर पाणी आल्याने वाहन चालकांची चांगलीच पंचाईत झाली. परिणामी, वाहतूक ठप्प झाली.
वीजघर येथे तिलारी घाटाच्या पायथ्याशी हत्तींना रोखण्यासाठी काही वर्षांपूर्वी खंदक मारले होते. या खंदकातील माती दरवर्षीच्या पावसाळ्यात रस्त्यावर येऊन रस्ता वाहतुकीस बंद होतो. मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे पुन्हा एकदा हा चिखल रस्त्यावर आला. त्यामुळे दोन्ही बाजूला वाहने अडकून पडली. हा रस्ता महाराष्ट्र राज्य रस्ते पायाभूत विकास महामंडळाच्या ताब्यात आहे. या महामंडळाचे कार्यालय जिल्ह्यात नाही. तर सा. बां. चे अधिकारी रस्ता आपल्या ताब्यात नसल्याने चिखल हटवायची जबाबदारी घेत नसल्याने वाहन चालक व नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.