

ओरोस : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या यशात कोकणचा वाटा मोठा आहे. यामुळे राज्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष पद कोकण आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळणे हे जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. मंगळवारी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची निवड जाहीर होताच जिल्ह्यात जल्लोष करण्यासाठी भाजपा संघटना सक्रिय झाली आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषद नगरपालिका शतप्रतिशत भाजपा कडे आणण्यासाठी त्यांची निवड महत्त्वाची ठरणार आहे, अशी प्रतिक्रिया भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली.
राज्य भाजपा प्रदेशाध्यक्ष निवडीबाबत निवडणूक प्रक्रिया मतदार यादी निश्चित झाली असून राज्य परिषद सदस्यांमार्फत फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रवींद्र चव्हाण यांच्या नावाला अनुमती दर्शवली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खा. नारायण राणे पालकमंत्री नीतेश राणे यांनी सुद्धा रवींद्र चव्हाण यांच्या नावाला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या निवडीमुळे कोकणला आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला हा बहुमान मिळणार आहे.
राज्यात दीड कोटी सदस्य आणि 123 आमदार असलेल्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र रवींद्र चव्हाण यांना मिळणार, यासारखी दुसरी आनंदाची गोष्ट नाही. मंगळवार 1 जुलै रोजी मुंबई वरळी येथे दुपारी होणार्या या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी मुंबईला रवाना झाले आहेत.
जिल्ह्यात सर्व तालुकास्तरावर या कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात येणार आहे. नूतन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी गेल्या 25 वर्षातील राजकीय प्रवासात युवा मोर्चा उपाध्यक्ष, नगरसेवक, स्थायी समिती सदस्य, आमदार, राज्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकामचे कॅबिनेट मंत्री म्हणून तसेच प्रदेश महामंत्री, सरचिटणीस अशा विविध पदावर यशस्वी काम केले आहे. रवींद्र चव्हाण यांच्या या प्रदेशाध्यक्ष निवडीमुळे कोकण तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या भाजपा संघटनला अधिक बळकटी मिळणार आहे,असा विश्वास प्रभाकर सावंत यांनी व्यक्त केला.