

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व हिंदी भाषिक बँक शाखा व्यवस्थापक व कर्मचारी यांच्यावर नियंत्रण आणावे. ग्राहकांना हिंदी, इंग्लिश भाषेत फॉर्म भरणे जमत नाही म्हणून तेथील कर्मचारी ग्राहकांना योग्य वागणूक देत नाहीत. ग्राहकांना तुच्छतेची वागणूक देणार्या अशा कर्मचारी, अधिकार्यांवर कारवाई करण्याबाबत संबंधित सर्वच बँकांच्या व्यवस्थापनांना आपण आदेश द्यावेत, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर, कार्यवाह नितीन वाळके, ग्राहक पंचायत राजचे जिल्हा प्रतिनिधी विष्णुप्रसाद दळवी आदींसह संघटनेच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची भेट घेऊन हे निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय-खासगी शेड्युल्ड मायक्रो फायनान्स वगैरे सुमारे 300 पेक्षा अधिक अधिकृत बँका व वित्तीय संस्था कार्यरत आहेत. पैकी 60 टक्के बँकांमध्ये परराज्यातील हिंदी भाषिक व्यवस्थापक व कर्मचारी कार्यरत आहेत. या बॅँक कर्मचार्यांकडून स्थानिक ग्राहकांना उद्धट, उर्मट, उत्तरे दिली जातात. सर्वसामान्य ग्राहकाशी हिंदीत संवाद साधला जातो. महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार प्रत्येक बँकांनी त्यांचे सर्व बोर्ड, माहितीपत्रक, विविध पावत्या, भिंतीवरील सर्व माहिती फलक या सर्व बाबी केवळ स्थानिक भाषा म्हणजे मराठी भाषेतच असणे अनिवार्य आहे. मात्र एकही शाखा व्यवस्थापक या निर्देशांचे पालन करताना दिसत नाही.
सदर हिंदी भाषिक कर्मचार्यांकडून ग्राहकांना अतिशय वाईट, तुच्छतेची, अपमानास्पद वागणूक दिली जाते. एखादा ग्राहक मराठीतून संवाद साधत असल्यास त्याला हिन दर्जाची वागणूक देवून आम्हाला मराठी येत नाही, आम्ही मराठी शिकणार नाही, आमची कुठेही तक्रार करा, गरज नसेल तर तुमचे खाते बंद करा, आम्ही हिंदी भाषेतच बोलणार, तुम्हाला हिंदी येत नसेल तर ती तुमची चूक आहे, अशी बेजबाबदार व नियमबाह्य वक्तव्ये या अमराठी कर्मचार्यांकडून जिल्ह्यातील मराठी ग्राहकाला ऐकावी लागतात.
याची दखल घेऊन आपण जिल्ह्यातील सर्व बँकांच्या व्यवस्थापनांना व अधिकार्यांना स्थानिक ग्राहकांना सन्मानजनक वागणूक देण्याची व मराठीतून संवाद साधण्याबाबत सूचना द्यावी, अशी मागणी व्यापारी महासंघाच्या पदाधिकार्यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली.