

मारूती कांबळे
वैभववाडी ः शिराळे गावाची शेकडो वर्षांची पारंपरिक गावपळण सध्या सडूरे हद्दीत मोठ्या उत्साहात सुरू असून शनिवारी या गावपळणीचा चौथा दिवस होता. कडाक्याच्या थंडीतही अबालवृद्ध, महिला, तरुण, लहान मुले सर्वजण या परंपरेचा मनसोक्त आनंद घेताना दिसत आहेत. सडूरे हद्दीत उभारलेल्या राहुट्यांमध्ये सध्या जणू एक छोटे गाव वसले आहे. प्रत्येक राहुट्यापुढे पेटवलेल्या शेकोट्यांच्या उजेडात रात्री उशिरापर्यंत गप्पा-गोष्टींचे फड रंगत असून थंडीही या उत्साहासमोर हार मानताना दिसते.
या ठिकाणी सुमारे 40 राहुट्या उभारण्यात आल्या असून ग्रामस्थांनी आपल्या संसाराची मांडणी केली आहे. एका कोपऱ्यात चुली पेटलेल्या असून चुलीवर शिजणाऱ्या पारंपरिक जेवणाचा आस्वाद ग्रामस्थ घेत आहेत. त्यामुळे जुन्या काळातील ग्रामीण जीवन पुन्हा अनुभवायला मिळत आहे दारात गुरेे बांधण्यासाठी गाताड्या घालण्यात आल्या आहेत. यात गुरांना बांधले जाते.
राहुट्यांच्या जवळून वाहणाऱ्या नदीपात्रातील झऱ्याचे पाणी पिण्यासाठी व स्वयंपाकासाठी वापरले जात आहे. तसेच कपडे धुणे व गुरांना पाणी पाजण्यासाठीही नदीतील पाण्याचा वापर होत आहे. गावपळणीदरम्यान दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आंब्याच्या झाडाखाली शिराळे गावाची सातवीपर्यंतची प्राथमिक शाळा भरवण्यात आली आहे. बिनभिंतीची आणि बिनछताची ही शाळा सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत असून विद्यार्थी मोकळ्या आकाशाखाली शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. विशेष म्हणजे, गावपळणीच्या ठिकाणी एस.टी. थांबा व्यवस्था करण्यात आली असून त्यामुळे ग्रामस्थांना व प्रवाशांची सोय उपलब्ध झाली आहे. परंपरा, निसर्ग आणि सामूहिक जीवनाचा अनोखा संगम अनुभवायला मिळणारी शिराळे गावाची ही गावपळण सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.Sindhudurg