

मालवण : मालवण शहराच्या मुख्य मासळी बाजार मत्स्यविक्रेत्या महिला आणि इतर व्यावसायिकांना भेडसावणाऱ्या अनेक समस्यांची दखल घेत नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी मंगळवारी नगरसेवक आणि पालिका अधिकाऱ्यांसह बाजाराची पाहणी केली. विक्रेत्यांच्या समस्या प्राधान्याने सोडवा आणि देखभाल दुरुस्तीची जी कामे आहेत त्या कामांचा प्रस्ताव तातडीने सादर करा, अशा सूचना नगराध्यक्षा सौ. वराडकर यांनी प्रशासनाला दिल्या.
शहरातील मासळी बाजारात अनेक समस्या असल्याची माहिती मिळाल्यानंतर नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी नगरसेविका शर्वरी पाटकर, नीना मुंबरकर, पूनम चव्हाण, मेघा गावकर, नगरसेवक सहदेव बापर्डेकर, निकीत वराडकर, प्रभारी मुख्याधिकारी हेमंत किरुळकर, स्वच्छता निरीक्षक संजय पवार, पाणी पुरवठा विभागाचे अमोल काटवळ, स्वच्छता विभागाचे मुकादम आनंद वळंजू, रमेश कोकरे, सुधीर आचरेकर, प्रतीक मालवणकर, मेगल डिसोझा, अनिकेत चव्हाण यांच्यासह भेट देत पाहणी केली. या पाहणीत प्रामुख्याने मत्स्यविक्रेत्या महिलांच्या बैठक व्यवस्थेतील त्रुटी समोर आल्या. सध्याची ओटे रचना चुकीची असल्याने महिलांना मासळी जमिनीवर ठेवून विकावी लागते. यामुळे विक्रेत्यांनी बैठक व्यवस्थेत तातडीने बदल करण्याची मागणी केली आहे. तसेच मंडईतील स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था झाली असून महिला विक्रेत्यांचे प्रचंड हाल होत आहेत. याची दखल घेत नगराध्यक्षांनी तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश दिले.
विजेचे डीपी उघडे
मटण व चिकन विक्रेत्यांच्या गाळ्यांजवळील विजेचे डीपी उघड्या स्थितीत असल्याचे निदर्शनास आले. यामुळे शॉर्टसर्किट होऊन मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने हा भाग तातडीने बंदिस्त करून तिथे स्वतंत्र दरवाजा बसविण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या .
मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली
चिकन विक्रेत्यांकडून शिल्लक मांस मासळी लिलावाच्या जागेत टाकले जात असल्याने तिथे मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. हा भाग पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा असल्याने पर्यटक आणि स्थानिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. यावर उपाय म्हणून शिल्लक मांस एकत्रित ठेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याचे आदेश प्रभारी मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांनी स्वच्छता विभागाला दिले.
पूनम चव्हाण यांनी प्रशासनाला धरले धारेवर
नगरसेविका पूनम चव्हाण यांनी प्रशासनाला धारेवर धरत स्वच्छता आणि बांधकाम विभागाने जुन्या चुकांकडे न पाहता आता मत्स्यविक्रेत्यांचे प्रश्न मार्गी लावावेत असे सांगितले. मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांनी स्वच्छतेचे प्रश्न त्वरित सोडवले जातील आणि बांधकामाशी निगडित जी कामे आहेत त्या कामांचा प्रस्ताव बांधकाम विभागामार्फत तयार करून कार्यवाही केली जाईल असे स्पष्ट केले. महिला मत्स्यविक्रेत्यांच्या सोयीसाठी आणि मंडईच्या स्वच्छतेसाठी पालिका प्रशासन कटिबद्ध आहे. उघड्या डीपीचा प्रश्न, पाण्याचा निचरा, बैठक व्यवस्था या समस्यांवर येत्या काळात योग्य तोडगा काढून त्या दूर करण्याची कार्यवाही केली जाईल जाईल, असे नगराध्यक्षा सौ. वराडकर यांनी यावेळी स्पष्ट केले.