

बांदा : बांदा बसस्थानक परिसरात शुक्रवारी सकाळी मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. बसस्थानकानजीक सर्व्हिस रोडवर उभा कंटेनर अचानक स्वतःहून पुढे सरकत थेट दुकानांमध्ये घुसल्याने परिसरात गोंधळ उडाला. या अपघातात तीन दुकाने, एक दुचाकी आणि एका हातगाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
मुंबई-गोवा महामार्गावरील बांदा उड्डाणपुलाखाली मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर कंटेनर चालकाने कंटेनर उभा करून तो चहा पिण्यासाठी जवळील टपरीकडे गेला होता. मात्र हँडब्रेक योग्य प्रकारे न ओढल्याने कंटेनर हळू हळू पुढे रस्त्यालगत असलेल्या दुकानांकडे गेला. त्यात एका हातगाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला, तर दोन दुकानांचे पत्रे व एका दुचाकीचे नुकसान झाले. या ठिकाणी सकाळच्या वेळेत नेहमीच नागरिक व ग्राहकांची मोठी वर्दळ असते. विशेषतः दोन चहाची दुकाने असल्याने येथे गर्दी असते. तसेच फुटपाथवरून पादचाऱ्यांची ये-जा सुरू असते. मात्र देव बलवत्तर म्हणून अपघाताच्या वेळी त्या ठिकाणी कोणीही उपस्थित नसल्याने मोठा अनर्थ टळला. ज्या दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे, त्या दुकानाचा मालक अपघाता वेळी काही कामानिमित्त एसटी स्टँडकडे गेला होता. त्यामुळे सुदैवाने त्याचा जीव वाचला. अन्यथा जीवितहानी अटळ होती, असे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. मात्र घटनेची सूचना देऊनही बांदा पोलीस तासाभराने घटनास्थळी पोहोचल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पोलिसांच्या या विलंबाबाबत नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत या अपघाताची कोणतीही अधिकृत नोंद बांदा पोलिस ठाण्यात नव्हती. या घटनेमुळे महामार्गालगत उभ्या अवजड वाहनांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, निष्काळजी वाहनचालकांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी होत आहे.