

सावंतवाडी : कोकणच्या विकासाची भाग्यरेषा ठरणार्या शक्तिपीठ महामार्गाला आता नवे, अधिक व्यापक वळण मिळण्याची शक्यता आहे. हा महामार्ग आता केवळ नागपूर-गोवा असा सरळ न राहता त्याची एक शाखा मळगावसह दोडामार्ग तालुक्यातील तिलारी आणि रेडीच्या दिशेने विभागून नेण्याचा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव समोर आला आहे. माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी ही माहिती दिली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या नव्या मार्गासाठी फेरसर्वेक्षणाचे आदेश दिल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
आमदार केसरकर यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधताना ही महत्त्वपूर्ण घोषणा केली. ते म्हणाले, आपण नुकताच इंडोनेशिया आणि सिंगापूर येथे पर्यटनाच्या द़ृष्टीने दौरा केला. तिथे पाचशे ते सात हजार रूमची भव्य हॉटेल्स आहेत. त्याच धर्तीवर सिंधुदुर्गात पर्यटन विकसित व्हावे, हे आमचे स्वप्न आहे. विशेषतः दोडामार्ग तालुक्यातील तिलारी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘अम्युझमेंट पार्क’ उभारण्याचा आमचा मानस आहे. मात्र, अनेकदा निविदा मागवूनही उद्योजक पुढे येत नव्हते. आता शक्तिपीठ महामार्ग थेट तिलारीपर्यंत पोहोचल्यास या परिसराचा कायापालट होईल आणि पर्यटनाला प्रचंड चालना मिळेल. एकंदरीत, शक्तिपीठ महामार्गाच्या नव्या संभाव्य आराखड्यामुळे सिंधुदुर्गाच्या पर्यटन नकाशावर तिलारी आणि रेडीचे महत्त्व अधोरेखित होणार आहे.
एकीकडे विकासाचा नवा आराखडा मांडत असताना, दुसरीकडे आमदार केसरकर यांनी जिल्ह्यातील महायुतीमधील अंतर्गत कुरघोडीवरही सूचक भाष्य केले. जिल्ह्यात सध्या महायुतीसाठी अत्यंत सकारात्मक राजकीय परिस्थिती आहे. खासदार, पालकमंत्री आणि आमदार आपलेच आहेत. त्यामुळे तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. या वादानंतर आपण मुख्यमंत्र्यांची भेट मागितली होती, असे सांगत त्यांनी थेट वादावर बोलणे टाळले. मात्र, कार्यकर्त्यांना एक महत्त्वाचा कानमंत्र दिला. ते म्हणाले, कोणाच्याही वक्तव्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची काळजी घेतली जाईल. यापुढे वादग्रस्त विधाने टाळण्याबाबत सर्वांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
पर्यटन केंद्री विकास: महामार्गाला थेट तिलारी आणि रेडीसारख्या पर्यटन स्थळांशी जोडणे.
गुंतवणुकीला चालना: दोडामार्ग येथील प्रस्तावित ’अम्युझमेंट पार्क’साठी उद्योजकांना आकर्षित करणे.
समग्र विकास: केवळ वाहतूक सुलभ न करता, जिल्ह्याच्या पश्चिम किनारपट्टी आणि सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या भागांचा एकाच वेळी विकास साधणे.
मुख्यमंत्र्यांचे निर्देश: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या नव्या आराखड्यासाठी सकारात्मकता दर्शवत फेरसर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, जिल्ह्यात कधी नाही ती आता चांगली राजकीय परिस्थिती आहे. खासदार, पालकमंत्री, आमदार महायुतीचे आहेत. त्यामुळे तिन्ही पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र राहावेत, त्या द़ृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे यापुढे कार्यकर्त्यांच्या भावना दुखावणार्या किंवा वाद निर्माण होणार नाहीत. कोणतेही स्टेटमेंट येणार नाहीत, असा शब्द त्यांनी दिला.